मुंबई : संस्कृती, परंपरा आणि साधेपणाची जपणूक करीत श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था आजही मुंबईमधील गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीत घटनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. भपकेबाजीपासून दूर, प्रदूषणमुक्त, प्रबोधन आणि संस्कृती जतनाचा मंत्र अखंडपणे जपणाऱ्या या मंडळाने एक आगळा आदर्श मंडळांपुढे ठेवला आहे.
ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी समाजात ऐक्य निर्माण करणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचे आवाहन केले. लोकमान्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीत १८९३ मध्ये मुंबईमधील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. चाळीत राहणाऱ्या समाजधुरिणांनी प्रबोधनाची कास धरत व्याख्याने, मेळे आदींच्या आयोजनातून प्रबोधनाचा कानमंत्र देण्यास सुरुवात केली. पुण्यापाठोपाठ मुंबईतील या चाळीत अगदी साधेपणाने सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १९०१ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भेट दिली. त्यानंतर हळूहळू गिरगाव आणि आसपासच्या परिसरातील चाळींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले.
हे ही वाचा…बेस्टकडून ‘पे ॲण्ड पार्क’ व्यवस्था
श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेची स्थापना करून केशवजी नाईकांच्या चाळीत गणेशोत्सव सुरू करण्यात आला. सुरुवातीला चाळीच्या गॅलरीमध्ये गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत होती. हळूहळू उत्सवाची व्याप्ती वाढू लागली आणि दोन चाळींमधील कच्च्या रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा होऊ लागला. विशेष म्हणजे उत्सवामध्ये पारदर्शकता यावी या उद्देशाने १९३५ मध्ये केशवजी नाईकांच्या चाळीतील तत्कालीन रहिवासी आणि पेशाने शिक्षक असलेल्या त्र्यांबक पुरुषोत्तम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेची घटना तयार करण्यात आली. उत्सवाचा हेतू आणि त्यांचे सामाजिक व धार्मिक पैलू, सभासदांची पात्रता, अधिकार व किमान वर्गणीची आकारणी, कार्यकारी मंडळाची सदस्य संख्या, सर्वसाधारण सभांचे आयोजन, त्यासाठी गणसंख्येचे बंधन, चर्चात्मक बाबींचा गोषवारा, गरजेनुसार विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन व ठराव संमतीचे नियम, गैरवर्तन करणाऱ्या सभासदाविषयी कारवाईची पद्धती आदींचा या घटनेमध्ये समावेश करण्यात आला. गणेशोत्सवासाठी १९४९ मध्ये सरकारी नियमावली संमत झाली. मात्र या संस्थेने यासंबंधीचे पाऊस १४ वर्षांपूर्वीच टाकले होते. काळानुरुप मुळ घटनेत १९६६ आणि १९७१ मध्ये बदलही करण्यात आले. घटनेनुसार उत्सव साजरा करणारी श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था ही पहिलीच संस्था म्हणावी लागेल.
ख्यातनाम व्यापारी केशवजी नायक यांनी १८६०-६१ या काळात गिरगावामध्ये चाळी उभारल्या. प्रामुख्याने मध्यमवर्गीय मराठी बांधवांसाठी बांधलेल्या या चाळी आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. कविवर्य केशवसूत, आद्य कामगार नेत कॉ. डांगे, ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी, मुंबई इलाख्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर, ‘प्रबोधन’कार ठाकरे, वीर वामनराव जोशी आदी मंडळी काही काळ केशवजी नाईकांच्या चाळीत वास्तव्यास होती. त्यामुळे या चाळींना ऐतिहासिक महत्त्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, साहित्यसम्राट न. चि. केळकर, जमनादास मेहता, दादासाहेब खापर्डे, शि. म. परांजपे, बॅरिस्टर जयकर, ‘भाला’कार भोपटकर, समतानंद अनंत हरी गद्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींनी केशवजी नाईकाच्या चाळीत संस्थेच्या व्यासपीठावरून स्वातंत्र्यलढ्याची ज्योत तेवत ठेवली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही चाळीतील रहिवाशांनी गणेशोत्सवात बदल केले नाहीत. समाजप्रबोधनाची कास धरत आजही नाईकांच्या चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे.
हे ही वाचा…मुंबई : शीव-पनवेल महामार्ग खड्ड्यांतच
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक १९०१ साली मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी केशवजी नाईकांच्या चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिली होती. त्या घटनेला २००१ साली शंभर वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने केशवजी नाईकांच्या चाळीतील रहिवाशांनी गणेशोत्सवादरम्यान ‘पुनरागमन टिळकांचे’या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. लोकमान्यांची हुबेहूब भूमिका वठविणारे पुण्यातील कलाकार बग्गीतून केशवजी नाईकांच्या चाळीत दाखल झाले. १९०१ सालातील नागरिकांच्या पेहरावाप्रमाणे पोषाख परिधान करून नागरिक टिळकांचे दर्शन घेण्यासाठी गिरगाव परिसरातील रस्त्यांवर दुतर्फा उभे होते. केशवजी नाईकाच्या चाळीत या मिरवणुकीचा समारोप झाला. मात्र एक ऐतिहासिक क्षण केशवजी नाईकांच्या चाळीतील तरुण पिढीमुळे मुंबईकरांना अनुभवता आला.
हे ही वाचा… Best Bus : मुंबईकरांच्या ‘बेस्ट’ बचाव अभियानाचे देखावे
स्वातंत्र्यपूर्वकाळात सुरू झालेल्या या गणेशोत्सवाच्या स्वरुपात आजही फारसा बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच आजही चाळीतील रहिवाशी एकोप्याने गणेशोत्साची तयारी करतात. अगदी मंडप उभारणीपासून सजावट, सांस्कृतिक, समाजप्रबोधन कार्यक्रमात रहिवासी हिरीरिने पुढाकार घेतात. विशेष म्हणजे आजही घटनेनुसारच चाळीतून वर्गणी गोळा करण्यात येते. जमा होणाऱ्या पुंजीतूनच उत्सव साजरा होतो. इतकेच नव्हे तर वर्षभर आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम, व्याख्यानमाला आदी कार्यक्रमही पूर्वीप्रमाणेच होतात. कोणताही भपकेबाज कार्यक्रम येथे होत नाही. अगदी साधेपणाने, मात्र संस्कृती आणि परंपरा जपण्याचे कार्य या गणेशोत्सवात अखंडपणे सुरू आहे. चाळीतील गणेशोत्सवात आजही तरुण, तसेच लहान मुले नृत्य, नाटीका, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून परंपरा जपत आहेत. संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपण्याचे कार्य आजही हे मंडळ कटाक्षाने पाळत आहे.