१४ कोटींच्या चरससह चौघांच्या अटकेनंतर प्रकरणाचा उलगडा

मुंबई : काश्मीरवरून आलेल्या चौघांना १४ कोटी रुपयांच्या चरससह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. मुंबईत आल्यानंतर पोलिसांचा समेमिरा चुकण्यासाठी आरोपी मोबाइल बंद करीत होते. तसेच चरस तस्करीसाठी महिला व लहान बाळाला महिन्यातून एकदा काश्मीरला नेण्यात येत होते. तसेच गाडीच्या मागच्या दरवाजामध्ये छुपी जागा तयार करून त्यातून अमली पदार्थाची तस्करी करण्यात येत असल्याचे आरोपींच्या चौकशीतून उघड झाले. 

जासर जहांगीर शेख (२४), बंडू दगडू उदानशिवे (५२), सिंथिया बंडू उदानशिवे ( २३) व क्लेरा बंडू उदानशिवे (५२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. बंडू हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून एएनसीने त्याला २०१० मध्ये ३९ किलो चरससह अटक केली होती. त्या वेळी काश्मीर येथील अनंतनाग येथील चार आरोपींसह सहा जणांना एएनसीबीने अटक केली होती. क्लेरा ही बंडूची पत्नी आहे. तर सिंथिया मुलगी व शेख हा जावई आहे.

काही संशयित त्यांच्या महिला साथीदारांसह काश्मीर येथून चरस आणून मुंबईत विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चेंबूर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुखे यांना मिळाली होती. या माहितीवरून युनिट ७ माधील पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम यांनी माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून सोमवारी दहिसर टोलनाक्यावरील दक्षिण वाहिनीवर  सापळा रचला होता. त्या वेळी संशयित गाडी आली असता ती थांबवून त्यातून आरोपींकडून २४ किलो चरस (आंतरराष्ट्रीय किंमत अंदाजे १४ कोटी ४० लाख रुपयांचे) जप्त करण्यात आले. आरोपीच्या विरोधात दहिसर पोलिसांनी कलम ८ (क), सह २०(क), २९ अमली पदार्थविरोधी कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. चरस लपवण्यासाठी गाडीच्या दरवाजाच्या पॅनलमध्ये व डिक्की बॅक पॅनलमध्ये छुपी जागा बनविण्यात आली होती.

तसेच चरस आणताना कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी महिला साथीदारांसह प्रवास करीत होते. जप्त करण्यात आलेले चरस हे श्रीनगर येथून आणल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.