मुंबई : राज्यात जुन्या वाहनांची खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक ऑनलाइन बाजारपेठेला प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांत जुन्या वाहन खरेदीदारांच्या संख्येत १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, महिला खरेदीदारांकडून ऑनलाइन पर्यायांना पसंती मिळत असल्याने दोन वर्षांत खरेदीदारांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. तसेच महिलामध्ये जुन्या (सेकंड-हँड) चारचाकीला मागणी वाढत आहे.
सुट्ट्यांच्या हंगामात सहकुटुंब प्रवास करण्यासाठी स्वमालकीची चारचाकी असणे हे सर्वसामान्य कुटुंबीयांचे स्वप्न असते. नव्या वाहनांची किंमत लक्षात घेता अनेक ग्राहक जुन्या वाहनाकडे वळतात. जुनी वाहने खरेदी करताना अनेक सवलती सहज उपलब्ध होत असल्याने, त्याचा फायदा ग्राहकांना होतो. जुन्या वाहनांच्या बाजारपेठेचे ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या स्पिनीच्या अहवालानुसार (वर्ष २०२५), डिजिटल विश्वासार्हता वाढल्याने ऑनलाइन वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे.
महिलांची भूमिका या बाजारात महत्त्वाची आहे. जुन्या मोटारगाड्या खरेदी करणाऱ्या महिलांची संख्या २०२२ मध्ये केवळ १० टक्के होते. २०२५ मध्ये महिला ग्राहकांची संख्या २६ टक्क्यांवर पोहोचली. आर्थिक स्वावलंबन आणि दर्जेदार वाहनामुळे हा बदल दिसून येतो. गेल्या तीन वर्षांत, या प्लॅटफॉर्मवरील महिलांचा सहभाग दुप्पटीहून अधिक वाढला आहे. आलिशान (लक्झरी) प्रकारातील स्वयंचलित (ऑटोमॅटिक) वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच खरेदीदारांचे सरासरी वय ३२ वरून ३४ वर्षांपर्यंत वाढले आहे.
मुंबई आघाडीवर
वाहनांच्या पसंतीनुसार, विक्रीमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा वाटा ३० टक्के होता. मुंबई ३५ टक्यांनी आघाडीवर आहे. इंधनाच्या विविध पसंतींमुळे बंगळुरू हे सर्वात वेगाने वाढणारे मार्केट, तर घरपोच डिलिव्हरीमध्ये कोची आघाडीवर आहे. चंदीगडमध्ये महिला खरेदीदारांचा वाटा ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जयपूरमध्ये खरेदीदारांचे वय सर्वात कमी सरासरी ३१ वर्षे आहे. पुणे आणि बंगळुरूमध्ये हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढती आवड दिसून येते.
३० -४० वयोगटातील महिला
दिल्ली – एनसीआरमध्ये महिला खरेदीदारांची संख्या सर्वाधिक ४८ टक्के आहे. मुंबईत ४६ टक्के,
बंगळुरू ४१ टक्के आणि पुण्यात महिलांचे प्रमाण ३९ टक्के आहे. बहुतेक महिला खरेदीदार ३० ते ४० वयोगटातील आहेत.
ऑटोमॅटिक गाड्यांना पसंती
महिला ऑटोमॅटिक हॅचबॅक मोटारीला जास्त पसंती देत आहेत. ६० टक्के महिला ऑटोमॅटिक गियर असलेल्या हॅचबॅक मोटारी पसंत करतात. कारण या गाड्या विशेषता शहरांमध्ये चालविण्यास सोप्या असतात. १८ टक्के महिलांची कॉम्पॅक्ट एसयूव्हीला पसंती आहे. रेनॉल्ट क्विड, ह्युंदाई ग्रँड आय १० आणि मारुती सुझुकी स्विफ्ट सारख्या गाड्या महिलांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत.
