मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ५५.१२ किमी लांबीच्या उत्तन – विरार सागरी सेतू प्रकल्पातील मुंबई – दिल्ली द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या १८.९५ किमी लांबीच्या जोडरस्त्यातील आंतरबदल मार्गिकेमधील (इंटरचेंज) मोठा अडसर अखेर दूर झाला. महामार्गाला जोडणाऱ्या आंतरबदल मार्गिकेच्या बांधकामास अखेर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तत्त्वतः मंजुरी दिली. त्यामुळे आता सागरी सेतू प्रकल्पातील मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या आंतरबदल मार्गिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल झाल्यास या आंतरबदल मार्गिकेमुळे दक्षिण मुंबईतून, नरिमन पॉइंटवरून थेट मुंबई – दिल्ली द्रुतगती महामार्गावर काही मिनिटांत पोहोचता येणार आहे.
वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूचा विस्तार मुंबई महानगरपालिकेकडून वर्सोवा – भाईंदर सागरी मार्गाद्वारे केला जात आहे. या सागरी मार्गाचा विस्तार उत्तन – विरार, विरार – पालघर सागरी सेतूद्वारे पालघरपर्यंत केला जाणार आहे. त्यानुसार उत्तन – विरार सागरी सेतू प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएकडून कार्यवाही सुरू आहे. ५५.१२ किमी लांबीच्या या सागरी सेतू प्रकल्पात २४.३५ किमीचा मुख्य सागरी सेतू आणि ३०.७७ किमीचे तीन जोडरस्ते (कनेक्टर) असणार आहेत.
उत्तन जोडरस्ता ९.३२ किमीचा, वसई जोडरस्ता २.५ किमीचा आणि विरार जोडरस्ता १८.९५ किमीचा असणार आहे. या तीन जोडरस्त्यांवर एकूण सहा आंतरबदल मार्गिका (इंटरचेंज) असणार आहेत. १८.९५ किमीच्या विरार जोडरस्त्यावर सहावी आंतरबदल मार्गिका असणार असून ही मार्गिका मुंबई – दिल्ली द्रुतगती महामार्गाला जोडणण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) सुमारे १३५० किमीचा मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. या महामार्गामुळे मुंबई – दिल्ली अंतर १२ ते १३ तासांत पार करता येणार आहे.
दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरातून थेट या महामार्गावर पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएने उत्तन – विरार सागरी सेतूद्वारे या महामार्गाशी जोडणी देण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पाच्या मूळ प्रस्तावाप्रमाणे १८.९५ किमीच्या विरार जोडरस्त्यावर मुंबई – दिल्ली महामार्गावर नेणारी आंतरबदल मार्गिका बांधण्यात येणार आहे.विरार जोडरस्ता आणि त्यावरील आंतरबदल मार्गिकेच्या कामासाठी एनएचएआय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची मंजुरी घेणे आवश्यक होते. यासाठी मंजुरी मिळावी यासाठी २०२३ पासून एमएमआरडीए प्रयत्नशील होती.
मात्र या मंजुरीस विलंब होत होता. पण आता मात्र एनएचएआय, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यास तत्त्वतः मंजुरी दिल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत ही मंजुरी देण्यात आली असून आता अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना यास दुजोरा दिला.सागरी सेतू आणि मुंबई-दिल्ली महामार्ग जोडणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
उत्तन-विरार सागरी सेतूच्या कामाला सुरुवात होण्याची अद्याप प्रतीक्षा आहे. मात्र हा सागरी सेतू प्रकल्प पूर्ण होऊन तो सेवेत दाखल झाल्यास उत्तन-विरार प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे. तसेच नरिमन पॉइंटवरून थेट विरारला आणि पुढे मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गावरही अतिजलद पोहोचता येणार आहे. सागरी किनारा मार्ग, वांद्रे-वरळी सागरी सेतू, वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू, वर्सोवा-भाईंदर किनारा मार्ग आणि पुढे उत्तन-विरार सागरी सेतू मार्गे थेट मुंबई-दिल्ली महामार्गावर वाहनांना जाता येणार आहे. त्यामुळे भविष्यात हा मोठा दिलासा वाहनचालक-प्रवाशांसाठी ठरणार असल्याचा दावा मएमआरडीएकडून केला जात आहे.
