मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) उत्तन – विरार सागरी सेतू प्रकल्पाला अखेर पर्यावरणीय मंजुरी मिळाली असून आता वन विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यास या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा मागविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा मार्ग डिसेंबरमध्ये मोकळा होण्याची शक्यता असून डिसेंबरअखेरीस या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून २०२७ मध्ये कामाला सुरुवात केली जाणार आहे. हा सागरी सेतू पूर्ण होऊन सेवेत दाखल झाल्यास उत्तन – विरार प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे.
वांद्रे – वर्सोवा सागरी सेतूला पुढे भाईंदरपर्यंत वर्सोवा–भाईंदर सागरी मार्गाने जोडणी दिली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई महापालिकेकडे आहे. तर भाईंदरपासून पुढे विरारपर्यंत जाणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीए उत्तन – विरारदरम्यान ५५.१२ किमी लांबीचा सागरी सेतू बांधणार आहे. यात २४.३५ किमीचा मुख्य सागरी सेतू असणार असून ३०.७७ किमीचे तीन अंतरबदल मार्ग असतील. त्यानुसार उत्तन अंतरबदल मार्ग ९.३२ किमी, वसई अंतरबदल मार्ग २.५ किमी, तर विरार अंतरबदल मार्ग १८.९५ किमीचा असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरणीय मान्यता मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला १८ मार्च रोजी मान्यता देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनीही यास दुजोरा दिला. या प्रकल्पास पर्यावरणीय मान्यता मिळाली असून आता एमएमआरडीएला वन विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची प्रतीक्षा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सागरी सेतूच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निविदा प्रसिद्ध करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तसेच कामास २०२७ मध्ये सुरुवात करण्याचेही नियोजन आहे. प्रकल्पास पर्यावरणीय परवानगी मिळाल्याने एमएमआरडीएने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आता २०२७ मध्ये कामाला सुरुवात झाल्यानंतर पाच वर्षांत सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. म्हणजेच २०३२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास उत्तन – विरार प्रवास अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे. तसेच नरिमन पॉइंटवरून थेट विरारला अतिजलद पोहोचणेही सोपे होणार आहे. कारण मुंबई सागरी मार्गाने नरिमन पॉइंटवरून निघालेली वाहने पुढे वरळी – वांद्रे सागरी सेतू, त्यानंतर वांद्रे – वर्सोवा सागरी सेतू आणि पुढे वर्सोवा – भाईंदर सागरी मार्गाचा वापर करून उत्तन – विरार सागरी सेतूमार्गे विरारला पोहोचतील. भविष्यात या सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत करण्यात येणार असल्याने नरिमन पॉइंटवरून थेट पालघरला अतिजलद पोहोचणे शक्य होणार आहे.
