उत्तराखंडात अद्यापही राज्यातील १५८ पर्यटक बेपत्ता

उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या महाप्रकोपात महाराष्ट्रातील १५८ पर्यटकांचा शोध लागू शकलेला नाही. बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना उत्तराखंड सरकारकडून मदत जाहीर झाल्यावर राज्य सरकार काही प्रमाणात मदत देणार आहे. उत्तराखंडमध्ये राज्यातील किती पर्यंटक गेले होते याची सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली होती.

उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या महाप्रकोपात महाराष्ट्रातील १५८ पर्यटकांचा शोध लागू शकलेला नाही. बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना उत्तराखंड सरकारकडून मदत जाहीर झाल्यावर राज्य सरकार काही प्रमाणात मदत देणार आहे. उत्तराखंडमध्ये राज्यातील किती पर्यंटक गेले होते याची सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली होती. त्यानुसार, अतिवृष्टीच्या वेळी ३०१४ नागरिक उत्तराखंडमध्ये गेले होते. यापैकी २८५८ नागरिक सुखरूपपणे राज्यात परतले. १५८ जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही, असे मदत व पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. बेपत्ता असलेल्या नागरिकांच्या नावांची यादी उत्तराखंड सरकारकडे पाठविण्यात आली आहे. या नागरिकांचा शोध घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. शोध न लागल्यास त्यांना मृत जाहीर करण्याबाबतचा निर्णय हा उत्तराखंड सरकार घेईल, असेही स्पष्ट करण्यात आले. या दुर्घटनेत राज्यातील चार जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन मुंबईचे तर रायगड आणि बुलढाणा जिल्ह्य़ातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
बेपत्ता किंवा संपर्क होऊ न शकलेल्या नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे मुंबई पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. यापैकी बहुतेक जण रुद्रप्रयाग किंवा गौरीकुंड येथे होते हे आढळून आल्याचे आपत्ती निवारण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदन यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये आपत्तीच्या वेळी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव यांच्या नेतृत्वाखाली ४८ अधिकाऱ्यांच्या पथकाने काम केले होते. या पथकातील काही अधिकाऱ्यांचा प्रातिनिधीक सत्कार डॉ. कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हावार आकडेवारी
मराठवाडय़ातील सर्वाधिक ७१ जण बेपत्ता. औरंगाबाद (१४), जालना (९), परभणी (२१), हिंगोली (६), नांदेड (४), लातूर (९), बीड (१२), नाशिक (२), नगर (१), जळगाव (१), नागपूर (३७), वर्धा (६), गोंदिया (१), पुणे (२५), सातारा (३), बुलढाणा (१), वाशिम (३), ठाणे (७)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uttarakhand floods maharastra 158 tourists still missing in uttarakhand