रिक्त जागांमुळे मुंबईतील आरटीओत वाहन परवाना प्रक्रियेत अडथळा

मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) रिक्त जागा, वारंवार बंद पडणारा सव्‍‌र्हर आदी विविध कारणांमुळे सध्या लायसन्स (अनुज्ञप्ती) प्रक्रियेचा खोळंबा होत आहे. मुंबईतील महत्त्वाच्या आरटीओत हीच अवस्था असून बुधवारी अंधेरी आरटीओत लायसन्ससाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांना अध्र्या तासाच्या कामासाठी तब्बल तीन ते चार तास तिष्ठत राहावे लागत होते. रांगा लागल्याने शारीरिक अंतर नियमाचाही फज्जा उडाला. सध्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरटीओतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही प्रचंड ताण येत आहे.

लायसन्स, परवाने वाटप यावर नियंत्रण ठेवणे, नवीन वाहन नोंदणी, वाहन तपासणी योग्यता प्रमाणपत्र इत्यादी कामांची जबाबदारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यावर (आरटीओ अधिकारी) असते. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटर वाहन निरीक्षक, साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ही पदे असतात. राज्यात ५० प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. यातील १६ ठिकाणीच प्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त आहेत, तर उर्वरित आरटीओ कार्यालयांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवरच जबाबदारी असते.

मात्र मुंबईतील ताडदेव, अंधेरी, पनवेल या कार्यालयांत गेल्या दोन वर्षांपासून आरटीओ अधिकारीच नाहीत. त्याव्यतिरिक्त अंधेरी कार्यालयात एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि दोन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीही नाही. तर ताडदेव आणि वडाळा कार्यालयातही दोन साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. याशिवाय बोरिवली आणि पनवेल कार्यालयांचीही तीच अवस्था असून मुंबईसह महानगरातील कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्याही बऱ्याच जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे कामांचा बोजवाराच उडत आहे. घरबसल्या ऑनलाइन शिकाऊ लायसन्स परीक्षेमध्ये अनेक तांत्रिक अडथळे येत असल्याने काही जण आरटीओ कार्यालयात येऊन परीक्षा देत आहेत. त्यातच कायमस्वरूपी लायसन्स आणि अन्य कामांसाठीही येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

अंधेरी कार्यालयात बुधवारी लायसन्स कामांचा गोंधळच उडाला. शिकाऊ लायसन्स आणि कायमस्वरूपी लायसन्स प्रक्रि येसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेकांना अध्र्या तासाच्या कामासाठी तीन ते चार तास लागत होते. त्यामुळे बरीच आरडाओरड सुरू होती. परिणामी रांग वाढत असल्याने शारीरिक अंतर नियमाचाही फज्जा उडत होता. सकाळी ११ वाजता शिकाऊ लायसन्सची परीक्षा देण्यासाठी आलेले सव्‍‌र्हर डाऊन झाल्याने दोन ते तीन तास रांगेतच होते. त्यातच कागदपत्र तपासणीसाठीही मनुष्यबळ नसल्याने आणि आरटीओ अधिकारीही देखरेखीसाठी नसल्याने कामे वेळत होत नसल्याचीही तक्रोर अनेक जण करत होते.

तांत्रिक अडचणी

इशान के मा हे शिकाऊ लायसन्स परीक्षा देण्यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून अंधेरी आरटीओ कार्यालयात होते. ११.२० वाजता परीक्षा होती; परंतु सव्‍‌र्हर डाऊन झाला आणि परीक्षा वेळेत झाली नाही. त्यातच कागदपत्र पडताळणीसाठी कर्मचारीही उपलब्ध नसल्याने ती प्रक्रि याही रखडली. त्यामुळे साधारण पावणेतीन वाजता परीक्षा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.