मुंबई : आरोग्य विभागाकडून गेल्या दोन वर्षात विविध उपकरणे, यंत्रसामग्री तसेच रुग्णालयांमध्ये खाटा वाढवून ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्याचे काम अत्यंत वेगाने सुरु असतानाच ज्या डॉक्टरांच्या जीवावर ही आरोग्य यंत्रणा चालणार आहे, त्यांच्या भरतीबाबत मात्र सरकारची उदासीनता आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची मोठमोठी उपकरणे, यंत्रसामग्री तसेच महागडे फिरते दवाखाने यांची खरेदी होत असताना रुग्णांवर उपचार कोण करणार, असा सवाल आरोग्य विभागातील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
एकीकडे राज्यात आजघडीला डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी आदी मिळून २० हजार पदे रिक्त आहेत. विशेषज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. गंभीरबाब म्हणजे राज्याला पूर्णवेळ आरोग्य संचालक नाहीत. तसेच अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालकांची डझनावारी पदे रिक्त आहेत. दुसरीकडे अतिदुर्गम आदिवासी भागात वर्षानुवर्षे कंत्राटी वेठबिगार म्हणून काम करणाऱ्या भरारी पथकाच्या २८१ डॉक्टरांना सेवेत कायम करण्यात टाळाटाळ केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी य डॉक्टरांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही त्यांना सेवेत कायम केले जात तर नाहीच उलट त्यांना कित्येकदा महिनोमहिने वेतनही दिले जात नाही. मात्र त्याचवेळेस आरोग्य विभाग सक्षम करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रुग्णालयांचे विस्तारीकरण तसेच नवीन रुग्णालये सुरु करण्याचे काम जोरात सुरु आहे. जून व जुलै या दोन महिन्यात जवळपास चाळीसहून अधिक ग्रामीण रुग्णालयांमधील खाटा वाढविण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये ५० ते १०० खाटा वाढवून उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करण्यात येणार आहे. मात्र खाटा वाढविताना तेथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व परिचारिकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नसल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. खरतर ग्रामीण रुग्णालये आजघडीला ४० टक्के क्षमतेनेच चालत असून एमडी मेडिसिन व अस्थिशल्यविशारद नसल्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवावे लागत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आज आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये पुरेसे भूलतज्ञ नाहीत तसेच अस्थिशल्यविशारद नसताना ग्रामीण रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करून आरोग्यमंत्री व स्थानिक आमदार नेमके काय करू पाहात आहेत असा सवालही डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
ज्या गतीने रुग्णालयीन बांधकामे करून खाटा वाढविण्याचे काम सुरु आहे तसेच नवीन रुग्णालये बांधण्याच्या घोषणा केल्या जात आहेत त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांची तसेच विशेषज्ञांची पदे भरण्याबाबत कोणताही ठोस कृती कार्यक्रम आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला नाही. आजघडीला विशेषज्ञ डॉक्टरांची साडेसहाशे पदे रिक्त आहेत अशावेळी विस्तारित रुग्णालये व नवीन रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या भरतीचे नेमके काय करणार हे गुलदस्त्यात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बालरोगतज्ज्ञांची ४८ टक्के पदे रिक्त आहेत तर स्त्रीरोगतज्ज्ञांची ५३ टक्के, नेत्रशल्यचिकित्सकांची ४१ टक्के, अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञांची ५० टक्के आणि भूलतज्ज्ञांची ३८ टक्के पदे रिक्त आहेत. याशिवाय क्ष-किरण तज्ज्ञांची ६३ टक्के तर मनोविकृतीतज्ज्ञांची ७१ टक्के पदे आजघडीला रिक्त आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेगवेगळ्या संवर्गांचा विचार केल्यास एकूण ६१ टक्के पदे भरण्यात आलेली नाहीत.
राज्यात मोठ्या प्रमाणात उपकरणे व यंत्रसामग्री घेण्याचे काम सुरु आहे. यात १६ ठिकाणी ह्रदयविकारावरील उपचारासाठी कॅथलॅब खरेदी, २२ ठिकाणी एमआरआय मशीन, ४९५ ठिकाणी डायलिसिस सुविधा, तसेच चार ठिकाणी रेडिओथेरपी युनिट, १७५६ अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी, मुतखड्यावरील उपचारासाठी लिथोट्रेप्सी मशीन खरेदी, याशिवाय ट्रॉमा केअर सेंटर, ट्रॉमा सेंटरना जोडून आयसीयू तसेच मॉड्युलर ऑपरेशन थिएटर यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. राज्यात १६ कॅथलॅब खरेदी करण्यात येणार असून यात आसीयू व मॉड्युलर ऑपरेशन थिएटर खरेदी केले जाणार आहे. नुकताच तीन कोटींचे फिरते दवाखाने खरेदीचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीत गाजला. या फिरत्या दवाखान्यात अशी कोणती उपकरणे आहेत ज्यामुळे याची किंमत तीन कोटी एवढी निश्चित करण्यात आली आहे असा सवाल आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोट्यवधी रुपयांची उपकरणे खरेदी करताना त्यासाठी किती तज्ज्ञ डॉक्टर व अन्य डॉक्टर तसेच कर्मचारी लागणार आहेत व त्यांची नियुक्ती कधी होणार या कळीच्या मुद्द्यावर कोणीच बोलायला तयार नाही. तीन कोटीच्या फिरत्या दवाखान्याचे वैशिष्ठ्य काय आहे तसेच यात कोणती उपकरणे असणार आहेत व त्यासाठी किती डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे, याबाबत आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांना लघुसंदेशाद्वारे विचारणा केली, मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. त्याचप्रमाणे हंगामी आरोग्य संचालकांकडेही विचारणा केली असता माहिती घ्यावी लागेल असे उत्तर मिळाले.