मुंबई : पालघरमधील वाढवण बंदर पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर आणि पूर्व डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर जोडणार जाणार असल्याची माहिती सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यामुळे पश्चिम बंगाल, उडीसा, छत्तीसगड, पंजाब, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यास हातभार लागेल, असे वैष्णव म्हणाले.
देशातील सर्वात मोठ्या बंदरापैकी वाढवण बंदर एक असेल. या बंदरामुळे पालघर परिसरात औद्योगिक विकास होऊन रोजगारांच्या संधी वाढतील. तसेच बंदरापासून ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मालवाहतूक सेवा कार्यरत राहण्यासाठी पूर्व आणि पश्चिम फ्रेट काॅरिडोर जोडले जाणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
राज्यात नवीन दोन बुलेट ट्रेन प्रकल्पे
बुलेट ट्रेनमुळे वेगात अंतर कापले जात असल्याने प्रवासातील वेळेची बचत होते. मुंबई ते पुणे बुलेट ट्रेन आणि पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प असे दोन प्रकल्पे राज्याला मिळाले. मुंबई ते पुणे बुलेट ट्रेनचा प्रवास फक्त ४८ मिनिटांत पूर्ण होईल. त्यामुळे मुंबई आणि पुणे एकाच शहरासारखे होईल. नोकरदार वर्गाला याचा फायदा होईल. पुणे ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रवास १.५५ तासात होईल. शैक्षणिक आणि औद्योगिक शहरांना कमी वेळेत गाठता येईल, असे वैष्णव म्हणाले.
राज्यातील १७ अमृत स्थानकांची कामे पूर्ण
अमृत स्थानक योजनेद्वारे प्रवाशांना नवा प्रवास अनुभव देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण १३२ स्थानकांचा संपूर्ण पुनर्विकास केला जात आहे. या स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी ५,६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. सध्या राज्यात १७ स्थानकांवरील कामे पूर्ण झाली आहेत. यात लासलगाव, चिंचपोकळी, देवळाली, परळ, सावदा, धुळे, वडाळा रोड, माटुंगा, केडगाव, लोणंद, मूर्तिजापूर जंक्शन, शहाड, चांदा फोर्ट, आमगाव, नेताजी सुभाषचंद्र बोस इटवारी जंक्शन, बारामती, नांदुरा या स्थानकात समावेश आहे.
नाशिक कुंभमेळ्यासाठी विशेष सुविधा दिल्या जाणार
प्रयागराज महाकुंभ मेळाप्रमाणे नाशिक कुंभमेळ्यासाठी भारतीय रेल्वेद्वारे सुविधा पुरवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली. प्रवाशांसाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या, अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रमुख स्थानकांवर जमाव क्षेत्रे, गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्हीद्वारे देखरेख आणि घोषणांद्वारे नियोजित वेळेचे व्यवस्थापन केले जाईल.
भारतात पहिली हायड्रोजन रेल्वे सुरू होणार
भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची हायड्रोजन ट्रेन हरियाणात सुरू होणार आहे. जिंद-सोनीपत मार्गावर (८९ किमी) दरम्यान धावेल. शून्य-उत्सर्जन करणारी आणि पर्यावरणपूरक ही ट्रेन असून ती ताशी ११० किमी वेगाने धावू शकते. तसेच डिझेल इंजिनला पर्याय ठरणार आहे.

