मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वडोदरा बुलेट ट्रेन स्थानक हे विद्यार्थी, युवा व्यावसायिक आणि उद्योगविश्वाला जोडणारे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. विद्यमान रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर उभारण्यात येणाऱ्या या स्थानकामुळे भारतीय रेल्वे, जीएसआरटीसी बस सेवा आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेशी थेट जोडणी मिळणार आहे.
महाराजा सयाजीराव विद्यापीठ, गतिशक्ती विद्यापीठ, आयआयआयटीसह अनेक उच्च शिक्षण संस्थांमुळे वडोदरा हे गुजरातमधील प्रमुख शैक्षणिक केंद्र मानले जाते. अभियांत्रिकी, औषधनिर्मिती, रसायने आणि उत्पादन क्षेत्रातील मजबूत औद्योगिक पाया लक्षात घेता बुलेट ट्रेनमुळे विद्यार्थी, संशोधक आणि युवा व्यावसायिकांना अहमदाबाद, सुरत आणि मुंबईतील शैक्षणिक व रोजगाराच्या संधींपर्यंत अधिक जलद पोहोचता येणार आहे. स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी आरामदायी प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, किरकोळ विक्री सुविधा, पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ विभाग, मोटारगाडी, बस, रिक्षासाठी स्वतंत्र वाहनतळ, आधुनिक स्थानक प्लाझा आणि सुस्पष्ट वे-फाइंडिंग व्यवस्था उपलब्ध असेल.
तीन पादचारी पुलाची सुविधा
– ५३४ मीटरचा पादचारी पूल –
बुलेट ट्रेन स्थानकाला वडोदरा रेल्वे स्थानक आणि जीएसआरटीसी सेंट्रल बस आगाराशी जोडणार; ट्रॅव्हलेटरची सुविधा.
– ९० मीटरचा पादचारी पूल –
अल्कापुरी परिसराशी थेट जोडणी.
– ५१ मीटरचा पादचारी पूल – स्थानक प्लाझा आणि वाहनतळाशी जोडणी; उद््वाहक आणि सरकत्या जिन्याची सुविधा.
वडाच्या झाडापासून प्रेरित वास्तुरचना
स्थानकाची रचना वडोदऱ्याच्या ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक असलेल्या वडाच्या झाडापासून प्रेरित आहे. प्रवासी क्षेत्रात नैसर्गिक प्रकाश आणि खुली रचना ठेवण्यात आल्याने स्थानक अधिक प्रशस्त, उजळ आणि आरामदायी अनुभव देईल. बुलेट ट्रेन स्थानकामुळे वडोदऱ्यातील तरुणांना शिक्षण, रोजगार, संशोधन आणि उद्योगजगताशी जोडणारी गतिशीलता वाढणार असून, हे स्थानक केवळ वाहतूक सुविधा न राहता नव्या संधींचे प्रवेशद्वार ठरणार आहे.
