मुंबई : सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता प्रकल्पातील (एससीएलआर) १.४ किमीच्या आणि चार पदरी वाकोला – बीकेसी उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामातील एक महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पार केला. या प्रकल्पाअंतर्गत वाकोला नाल्यावरील पुलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्तरावर ५४ मीटर लांबीच्या दुहेरी कॉम्पोझिट गर्डरची यशस्वीरित्या उभारणी करण्यात आली. या गर्डरच्या उभारणीच्या अनुषंगाने उन्नत रस्त्याचे संरचनात्मक काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे एकूण कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता मे अखेरीस हा उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा उन्नत रस्ता सेवेत दाखल झाल्यास वाकोला – बीकेसी अंतर १० मिनिटांत पार करता येणार आहे.

विस्तारीकरणाअंतर्गत तीन उन्नत रस्त्यांची बांधणी

एमएमआरडीएच्या एससीएलआर प्रकल्पाचा विस्तार तीन उन्नत रस्त्यांच्या माध्यमातून करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यापैकी दोन उन्नत रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून हे दोन्ही उन्नत रस्ते सेवेत दाखल आहेत. शेवटचा आणि तिसरा वाकोला – बीकेसी उन्नत रस्ता सेवेत दाखल होणे बाकी आहे. हा रस्ता मार्चमध्ये पूर्ण होऊन सेवेत दाखल होईल असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते. मात्र काम पूर्ण न झाल्याने मार्चचा मुहूर्त चुकला असून त्यानंतर एमएमआरडीएने एप्रिलची तारीख दिली. आता एप्रिल संपून मे सुरू झाला असून अजूनही या उन्नत रस्त्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे.

आता मात्र या उन्नत रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून मे अखेरीस हा रस्ता वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या उन्नत रस्त्यातील शेवटच्या ५४ मीटरच्या आणि ३५८ मेट्रिक टन वजनाच्या दुहेरी कॉम्पोझिट गर्डरची नुकतीच यशस्वीरित्या उभारणी करण्यात आली. वाकोला नाल्यावरील पुलाच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्तराला जोडणारा हा गर्डर आहे. या गर्डरच्या उभारणीच्या अनुषंगाने आता उन्नत रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पूर्ण करून हा रस्ता मे अखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

२० ते २५ मिनिटांचा प्रवास केवळ १० मिनिटांवर

वाकोला – बीकेसी उन्नत रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाल्यास बीकेसीतून पश्चिम द्रुतगती मार्गाला आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरून बीकेसीला पोहोचणे सोपे होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आजघडीला बीकेसीवरून वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्गाला वा वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्गावरून बीकेसीला पोहोचण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. मात्र हा उन्नत रस्ता सेवेत दाखल झाल्यास प्रवास केवळ १० मिनिटांत करता येणार आहे. तर हा उन्नत रस्ता सेवेत दाखल झाल्यास विस्तारित सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचे १०.८८ किमीच्या मार्गिकांचे जाळेही पूर्ण होणार आहे.