मुंबई : पश्चिम उपनगरातील वाकोला नदीत कचरा फेकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी मुंबई महापालिका आता नदीच्या काठी संरक्षक भिंतीवर १० फूट उंच जाळ्या लावणार आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार वरूण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार घनकचरा विभागाने या जाळ्या बसवण्याचे ठरवले आहे. याकरिता पालिका प्रशासन १.७९ कोटी रुपये खर्च करणार आहे.
वाकोला नदीच्या काठावर ज्ञानेश्वर झोडपट्टी असून या रहिवाशांकडून वाकोला नदीत सतत कचरा टाकला जात अल्यामुळे नदी अतिशय खराब झाली आहे. नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नदीत कचरा टाकण्याच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार वरूण सरदेसाई यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. या भागात वाकोल नदीत मोठ्या प्रमाणावर तरंगणारा कचरा दिसून येत असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर पालिका प्रशासनाकडे येत असतात. त्यामुळे वाकोला नदीच्या संरक्षण भिंतीवर जाळी बसवण्याच्या सूचना पर्जन्य जलवाहिन्या विभागाला देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी अशा प्रकारच्या जाळ्या मेन एव्हेन्यू नाला, दक्षिण एव्हेन्यू नाला येथेही बसवण्यात आल्या असून त्यामुळे नाल्यात कचरा टाकण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांमध्ये कचरा फेकणाऱ्यांना रोखण्यासाठी नाल्यांच्या काठावर उंच जाळ्या बसवण्याचा प्रयोग पालिका प्रशसानाने काही ठिकाणी केला आहे. दरवर्षी नालेसफाईला सुरुवात झाली की नाल्यांच्या काठावर जाळ्या बसवण्याचा विचार पुढे येतो. पावसाळ्यात नाले तुंबून मुंबईत पाणी साचू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्याच्या आधी नालेसफाई केली जाते. नाल्यात गाळापेक्षा तरंगत्या कचऱ्याचेच प्रमाण अधिक असते.
नाल्याच्या काठावर असणाऱ्या झोपडपट्ट्यांमधून हा कचरा नाल्यात टाकला जातो. त्यामुळे नाले तुंबतात. नालेसफाई केली तरी लगेचच आठ दिवसात नाल्यामध्ये पुन्हा कचरा जमा होतो. त्यामुळे नाल्यांच्या काठावर काही ठिकाणी पालिका प्रशसानाने जाळ्या बसवल्या आहेत. नाल्यांच्या काठावर संरक्षक भिंती असल्या तरी भिंतीच्यावरून कचरा फेकला जातो. त्यामुळे या भिंतीच्या वर १० फूट उंच जाळ्या लावण्याची शक्कल पालिका प्रशासनाने लावली आहे. याच पद्धतीने आता वाकोला नदीच्या काठावरही जाळ्या बसवल्या जाणार आहेत.
मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईचा बराचसा भाग हा खोलगट बशीसारखा सखल आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेणारे पर्जन्यजल वाहिन्यांचे जाळे हे त्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. मुंबई व उपनगरात ३०९ मोठे नाले व १५०८ छोटे नाले, रस्त्याच्या कडेला असलेली २००० किमी लांबीची गटारे, पाच नद्या यातून हे पावसाचे पाणी समुद्रात जात असते. मात्र नाले, गटारे यामध्ये वर्षभर समुद्रातून येणारा व आजूबाजूच्या वस्त्यांमधून टाकला जाणारा कचरा, प्लास्टिक, गाद्या, उशा, लाकडी सामान साठत असते. त्यामुळे हे नाले तुंबतात. पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी हा गाळ काढणे आवश्यक असते. नागरिकांकडून फेकला जाणारा तरंगता कचरा ही नालेसफाईतील मोठी समस्या आहे. अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा नालेसफाई करावी लागते.
