मुंबई : कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यावरील वाढता ताण कमी करून उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र अंबरनाथ रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडणार आहे. वाढती प्रवासी संख्या, चोरी, मारहाण आणि फटका टोळ्यांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर हे ठाणे महत्त्वाचे मानले जात आहे.
महाराष्ट्र पोलीस लोहमार्ग, मुंबई अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या या पोलीस ठाण्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाला वेग येण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवणे आणि कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखणे शक्य होणार आहे. गृह विभागाने ३ मार्च २०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, आसनगाव, अंबरनाथ आणि भाईंदर या चार नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांना मान्यता दिली होती. त्यापैकी अंबरनाथ पोलीस ठाणे आता प्रत्यक्ष सेवेत दाखल होत आहे. या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर ही प्रमुख स्थानके असतील. या तीन स्थानकांच्या हद्दीत २०२४ मध्ये २९०, २०२५ मध्ये २८२, तर यावर्षी आतापर्यंत १८३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. स्वतंत्र ठाण्यामुळे आरोपींचा शोध घेणे, चोरीचा ऐवज हस्तगत करणे आणि गुन्ह्यांचा तपास अधिक जलद होण्याची अपेक्षा आहे.
कल्याण ते बदलापूरदरम्यान गेल्या काही वर्षांत प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील नागरीकरणामुळे रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची संख्या वाढल्याने मोबाइल अथवा मौल्यवान ऐवजांची चोरी, प्रवाशांतील वाद आणि फटका टोळ्यांच्या हालचालीही वाढल्या होत्या. मात्र, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यावर अनेक स्थानकांची जबाबदारी असल्याने कारवाईत विलंब होत होता.
रेल्वे पोलीस ठाण्यांची संख्या वाढली
मुंबई उपनगरीय रेल्वेवरून दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. १९९९ पासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण १७ रेल्वे पोलीस ठाणे कार्यरत होती. गेल्या वर्षी आसनगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन रेल्वे पोलीस ठाण्यांची भर पडली. त्यानंतर भाईंदर येथे नवीन रेल्वे पोलीस ठाणे सुरू झाले होते. आता अंबरनाथ रेल्वे पोलीस ठाणे कार्यरत झाल्याने उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेला आणखी बळ मिळाले आहे.
उद्घाटन कार्यक्रमास लोहमार्ग पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे, लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर,पश्चिम परिमंडळाच्या पोलीस उप आयुक्त सुनिता साळुंखे-ठाकरे, मध्य परिमंडळाच्या पोलीस उप आयुक्त प्रज्ञा जेडगे,कल्याण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा कुलकर्णी आदी उपस्थित असणार आहेत.
अंबरनाथ रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी लक्ष्मण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, या रेल्वे पोलीस ठाण्यात एक पोलीस उप-निरीक्षक, एक श्रेणी पोलीस उप-निरीक्षक आणि ५१ पोलीस अंमलदार कर्तव्यावर असतील.
