मुंबई : वंचित बहुजन आघाडीची मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी होती. काँग्रेसने आपल्या प्रचार सभांमध्ये काँग्रेस-वंचित-रासप आघाडीला मतदान करा, असा आघाडीचा एकत्रित प्रचारच केला नाही. परिणामी, त्याचा फटका वंचित बहुजन आघाडीला बसला, असा आरोप वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी शनिवारी केला. मात्र वंचितचे आरोप काँग्रेसने फेटाळले आहेत.

काँग्रेसबरोबर आमची नांदेड, लातूर आणि मुंबईत आघाडी होती. लातूर आणि नांदेडमध्ये आघाडी म्हणून आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित मतदारांना सामोरे गेलो. तसे मुंबईत घडले नाही. त्यामुळे काँग्रेसची मुस्लीम मते वंचितला मिळाली नाहीत. त्याचा फटका वंचितला बसला आहे. परिणामी मुंबईत वंचितला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांचे हे अपयश आहे, असे मोकळे पत्रकार परिषदेत म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी संदर्भात जो आरोप केला जात आहे, तो चुकीचा आहे. वंचितला मुंबईत हव्या असलेल्या जागा दिल्या होत्या. मात्र वंचितला तितके उमेदवार मिळाले नाहीत. त्यांनी काही जागा परत केल्या तसेच अनेक जागांवर आघाडी असताना आम्हाला मैत्रिपूर्ण लढावे लागले. दोन्ही बाजूकडून अधिक चांगल्या प्रकारे नियोजन झाले असते तर अधिक चांगले झाले असते, असे वंचितच्या आरोपांवर मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने मुंबईत ४५ तर काँग्रेसने १५२ जागा लढवल्या होत्या. काँग्रेसच्या २४ जागा निवडून आल्या आहेत. मात्र वंचितला खातेही खोलता आले नाही. काँग्रेससाेबत आघाडी असलेल्या लातूर आणि नांदेड महानगरपालिकांमध्ये मात्र वंचितच्या प्रत्येकी पाच जागा निवडून आल्या आहेत. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने काँग्रेस व वंचितसोबतच्या आघाडीत मुंबईत ५ जागा लढवल्या होत्या. या पक्षालाही मुंबईत जागा मिळाल नाही.

यश समाधानकारक : काँग्रेस

महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या जोरावर साम, दाम, दंड, भेद नितीचा मोठ्या प्रमाणात वापर केला. तरीसुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते निर्धाराने व न डगमगता लढले व विजय मिळवला. अत्यंत विपरीत परिस्थितीत झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत मिळालेले यश मोठे नसले तरी समाधानकारक आहे, असे मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.