मुंबई : ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. हा बंद मोडून काढण्यासाठी वंचितच्या ३ हजार ५०० आंदोलकांना बुधवारी रात्री पोलीसांनी घरावर नोटीसा लावल्या असून त्यांना घरात नजरकैद केले आहे, असा आरोप वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आजच्या बंद संदर्भात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलीस आणि सरकारची आहे. आम्ही शांततेत बंद करत आहोत. माकप, भाकप, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण गट यांनी या आजच्या बंदला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसनेही काल पाठिंबा जाहीर केला आहे.हा बंद यशस्वी होईल. हा सामान्यांचा बंद आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या ३५०० कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटीसा बजावल्या आहेत. अनेकांच्या घरावर रात्री नोटीसा लावल्या आहेत. या कार्यकर्त्यांना घरातून बाहेर पडू दिले जात नाही. त्यांना त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह उजव्या संघटना आज राज्यात संघर्ष निर्माण करण्याची शक्यता आहे. पोलीसांनी कायद्यानुसार काम करावे, केवळ सरकारसाठी काम करु नये, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बंदला पाठिंबा देण्याचे सर्व विरोधी पक्षांनी आवाहन केले होते. काँग्रेस व डावे पक्ष वगळता इतर पक्षांनी आंबेडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थ्यांपेक्षा विरोधी पक्ष सरकारला अधिक घाबरतात, त्यामुळे ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी या आंदोलनामध्ये ते सावध भूमिका घेत आहेत, असा आरोप आंबेडकर हे सातत्याने करत आहेत. आंबेडकर यांनी सर्वप्रथम जंतर मंतर येथे जावून विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे नुकत्याच झालेल्या आंदोलनात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थाच्या गुन्ह्यात अडकवण्याची पोलीसांनी दिलेली धमकी ही अत्यंत गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणीक जीवन उद्धवस्त करण्याचा हा डाव आहे. नोकरीच्या वेळी चारित्र्याचे प्रमाणपत्र पोलीसांकडून आणण्याची तरतूद रद्द केली पाहिजे. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला पाहिजे. ही समस्या देशात सर्वत्र आहे. पोलीस आणि सरकारच्या हातातील युवकांना धमकवण्याचे हत्यार कायद्याने काढून घेतले पाहिजे, अशी भूमिका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.