मुंबई: अत्याधुनिक आणि वेगवान सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसलाही मध्य रेल्वेवरील ओव्हरहेड वायर (ओएचई) बिघाडाचा फटका बसला. गाडी क्रमांक २०७०६ मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी दुपारी कसारा – इगतपुरी घाट विभागात ओएचई इन्सुलेटरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सुमारे ३० मिनिटे खोळंबली. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत केल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, दुपारी ४.३५ ते सायंकाळी ५.०७ या कालावधीत कसारा आणि इगतपुरी स्थानकांदरम्यान ओएचई इन्सुलेटरमध्ये बिघाड झाला. सुरक्षिततेच्या दृष्टीने वंदे भारत एक्स्प्रेस थांबविण्यात आली. माहिती मिळताच तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचले आणि अल्पावधीतच दोष दूर करून ओव्हरहेड वीजपुरवठा सुरळीत केला.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेवर ओएचई, सिग्नल, पॉइंट्स आणि इतर तांत्रिक बिघाडांच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यात आता देशातील प्रीमियम आणि सेमी-हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसलाही अशा बिघाडाचा फटका बसल्याने रेल्वेच्या तांत्रिक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सुमारे ३० मिनिटांचा विलंब झाला. मात्र, बिघाड लवकर दूर करण्यात आल्याने घाट विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक तांत्रिक तपासणीनंतरच गाडी पुढे सोडण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
