जामनगर : वन्यजीवांच्या बचाव, उपचार आणि संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या वनतारा संस्थेचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला. एक वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. उद्योगपती अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या या उपक्रमाने गेल्या वर्षभरात हजारो वन्य प्राण्यांना उपचार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
वर्षभरात वनताराच्या पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी मोठ्या मांजरवर्गीय प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि इतर सस्तन प्राण्यांवर विविध जटिल शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा निरोगी केले. उपचारानंतर अनेक प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यातही यश मिळाले आहे. या कार्याची दखल घेत अनंत अंबानी यांना वन्यजीव संवर्धनातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ग्लोबल ह्युमन पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच संस्थेला ऐराझा आणि एसईएझेडए यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची सदस्यता, ग्लोबल ह्युमन कर्न्व्हेझेशन सर्टिफिकेट तसेच प्राणी मित्र पुरस्कार २०२५ मिळाला आहे.
वनताराने केवळ प्राण्यांच्या उपचारांवरच भर न देता प्रशिक्षणालाही प्राधान्य दिले आहे. वर्षभरात ५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आणि कार्यक्रम आयोजित केले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमही राबवले. संस्थेने वर्षभरात प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या प्राण्यांचे बचावकार्य केले. २५० हून अधिक हत्तींची काळजी घेतली जात असून, अनेक हत्ती संधिवात आणि वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असल्याने त्यांना विशेष वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. याशिवाय हजारो मगरांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे.
वन्यजीव आरोग्य व्यवस्थेत योगदान देण्यासाठी वनताराला पश्चिम विभागासाठी राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या अंतर्गत संस्थेने वन्यजीवांच्या आरोग्याचा समावेश ‘वन हेल्थ’ प्रणालीत केला आहे. वनतारामध्ये आधुनिक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि ११ उपप्रयोगशाळा कार्यरत असून ७० हून अधिक तज्ज्ञ दररोज २,००० पेक्षा अधिक निदान नमुन्यांवर प्रक्रिया करतात.
स्वयंचलित प्रणालीद्वारे सुमारे १.५६ लाख किलो उच्च प्रतीचे प्राणीआहार तयार केला जातो. हा आहार तापमान नियंत्रित ५० वाहनांद्वारे प्राण्यांपर्यंत पोहोचवला जातो. यासाठी २०० प्रशिक्षित कर्मचारी तसेच चारा उत्पादन करणारे १,००० हून अधिक शेतकरी सहभागी आहेत. तसेच २०० सदस्यांचे २४ तास कार्यरत बचाव पथक ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय बचाव मोहिमांमध्ये सहभागी झाले आहे. गुजरात वन विभागाच्या सहकार्याने ५३ हरिणांना बर्डा वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले. तसेच इंडोनेशियामध्ये सापाच्या मानेचा कासव या प्रजातीच्या पुनर्वसनाचा उपक्रमही राबविण्यात आला.
