मुंबई : गेल्या चार वर्षांत २,६०२ वन्यप्राणी गुजरात येथील वनतारा प्रकल्पात विविध देशांतून आयात करण्यात आले आहेत. मूळ भारतीय प्रजातींचे तसेच अनेक मूळ परदेशी प्रजातींच्या प्राण्यांचा त्यात समावेश आहे. अनेक दुर्मीळ, अस्तित्व धोक्यात असलेल्या प्राण्यांचाही आयात करण्यात आलेल्या प्राण्यांत समावेश आहे.
गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या आकाश अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पातील ग्रीन्स झुओलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिएशन सेंटर येथे हे प्राणी आयात करण्यात आले आहेत. वाघ, बिबटे, सिंह यांसह भारतात आढळणार्या वन्य प्रजातींबरोबरच अनेक परदेशी प्रजातींचे प्राणी, पक्षीही आणण्यात आले आहेत. या प्राण्यांमध्ये अनेक दुर्मीळ प्रजातींचाही समावेश आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) नोंद केलेल्या धोक्याच्या पातळीवर असलेल्या प्रजातींचाही आयात करण्यात आलेल्या वन्य पशू पक्ष्यांमध्ये समावेश आहे. सर्वाधिक प्राणी २०२४ मध्ये आयात झाले आहेत. त्यात सर्वाधिक रेटिक्युलेटेड अजगर आहेत. गेल्या वर्षी ५५२ प्रजातींचे प्राणी, पक्षी वनतारामध्ये दाखल झाले आहेत. जगभरातील २५ देशांतून ४० पेक्षा अधिक प्रजातींचे पशू-पक्षी आणण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांतील म्हणजे २०२२ ते २०२५ या कालावधीतील ही आकडेवारी आहे. याबाबत वनताराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नातून ही आकडेवारी उघड झाली. देशभरात २०२१ ते २०२५ आयात करण्यात आलेल्या प्राण्यांची माहिती विचारण्यात आली होती. वनताराबरोबरच म्हैसूर येथील श्री चामराजेंद्र झूलॉजिकल गार्डन, आसाम स्टेट झू कम बोटॅनिकल गार्डन, पद्मजा नायडू हिमालयन झूलॉजिकल पार्क, मध्य प्रदेशातील नॅशनल पार्क, बानेरघाट बायोलॉजिकल पार्क येथेही वन्यजीव आयात करण्यात आले आहेत. या सगळ्या केंद्रातील मिळून पाच वर्षांतील आयात प्राण्यांची संख्या ६३ आहे. आकडेवारीबरोबरच किती पशू-पक्षी जगले याचीही आकडेवारी मागण्यात आली होती. मात्र अशी आकडेवारी उपलब्ध नसल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आले.
कोणत्या देशातून प्राण्यांची आयात?
सर्वाधिक प्राणी हे संयुक्त अरब अमिरातीतून आले आहेत. त्याशिवाय इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, सायप्रस, अर्मेनिया, सीरिया, कझाकिस्तान, कतार, इराक, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, जर्मनी, नेदरलँड, इंग्लंड, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, फ्रान्स, डेन्मार्क, पोर्तुगाल, मेक्सिको, अमेरिका आणि रशिया अशा एकूण २५ देशांतून प्राणी वनतारामध्ये दाखल झाले आहेत.
वर्षानुसार किती आयात प्राणी-पक्षी?
२०२५ – ५५२
२०२४ – १५२१
२०२३ – ३४६
२०२२ – १८३
एकूण – २६०२
कोणते प्राणी, पक्षी?
रेटिक्युलेटेड अजगर (९६४), चित्ते (२०६), वाघ (निश्चित प्रजाती न कळलेले – २३४), भारतीय वाघ (४१), सायबेरिअन वाघ (२१), सुमात्रन वाघ (२), सिंह (१६५), प्लम-हेडेड पोपट/ टुई पोपट (११२), पाणघोरपड (१००), शशकर्ण / कॅराकल (८८), निकोबार कबुतर (७४), स्मॉल क्लॉव्हड ओटर (६७), आशियायी सोनेरी मांजर (५४), अलेक्झांड्रिन पोपट (५०), तपकिरी अस्वले (४८), बिबटे (४४), भारतीय अजगर (३६), सन बेअर (३५), बिंटुरॉन्ग/ बेअर कॅट (३१), लांडगे (३०), आशियाई काळी अस्वले (२४), नागराज (२४), लिंक्स (२४), रान मेंढ्या (२०), लॉर्ड डर्बी पोपट (२०), बर्मी अजगर (१९), लाल छातीचा पोपट (१६), बहिरी ससाणा (१६), क्लाऊडेड बिबटे (११), जंगली मांजर (१०), रेड पांडा (१०), ध्रुवीय लांडगे (९), वाईल्ड कॅट (८), महाधनेश (८), युरोपियन पोलेकॅट (७), आर्टिक कोल्हे (५), मार्बल कॅट (१), हिमबिबटे (४), यलो थ्रोटेड मार्टिन (४), अलास्कन लांडगे (४), एक शिंगी गेंडे (३), खार्या पाण्यातील मगर (२), वाघाटी (२), तायरा (२), राखाडी शेकरू / ग्रिझल्ड जाएंट स्क्वेरल (२)
