मुंबई : शहरी नक्षलवादाच्या आरोपाप्रकरणी वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर बाहेर असलेले तेलुगु कवी आणि लेखक वरवरा राव यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती गुरुवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. न्यायालयानेही त्याची दखल घेत त्यांच्या सध्याच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल पुढील सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश संबंधित

खासगी रुग्णालयाला दिले. त्याचवेळी राव यांना अभ्यार्पणासाठी २ डिसेंबपर्यंतची मुदतवाढही दिली.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी राव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ६ नोव्हेंबरला पुन्हा नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड्. आनंद ग्रोव्हर यांनी दिली. तसेच त्यांच्या अंतरिम जामिनाला चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणीही केली. त्यावर त्यांची याचिका ही अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीपर्यंतच मर्यादित ठेवावी आणि अन्य मागण्यांसाठी त्यांना स्वतंत्र याचिका करण्यास सांगावे, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेतर्फे (एनआयए) अ‍ॅड्. संदेश पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजू थोडक्यात ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २९ नोव्हेंबपर्यंत करून त्यावेळी राव यांच्या सध्याच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश नानावटी रुग्णालयाला दिले.

मागणी.. वैद्यकीय कारणास्तव उच्च न्यायालयाने राव यांना फेब्रुवारी महिन्यात सहा महिन्यांचा अतंरिम जामीन मंजूर केला होता. तसेच त्यांना मुंबईतच राहण्याचे आदेश दिले होते. अंतरिम जामिनाची मुदत संपण्याआधी राव यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच अंतरिम जामिनाची मुदत वाढवण्याची आणि मुंबईऐवजी हैदराबाद येथील घरी राहण्याची मुभा देण्याची मागणी केली होती.