दहिसर येथे काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक वारकरी शिल्पाची विटंबना केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन व्यक्ती एका स्कुटीवरुन येतात. यापैकी दोघेजण खाली उतरुन या शिल्पाची विटंबना करताना दिसत आहेत. स्कुटी येऊन हे शिल्प उभारण्यात आलं आहे त्या चौकात थांबते. त्यानंतर मागील बाजूस बसलेली व्यक्ती स्कुटीवरुन उतरते. या व्यक्तीसोबत असणारे इतर दोघेजण शिल्पाची विटंबना करताना दिसतात. यामध्ये एकजण शिल्पामधील वारकऱ्याची मुर्ती पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्कुटीवरील दोघेजण शिल्पाची विटंबना करत असताना मागे बसलेली व्यक्ती मात्र दूर उभी राहून हा सारा प्रकार पाहताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. हे काम नक्की कोणी केलं?, हे तिघे जण कोण आहेत यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत.

या घटनेवरून आचार्य तुषार भोसले यांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिलाय. “बोरिवलीमधील दहिसरमध्ये काही नराधमांनी वारकरी शिल्पाची जाणीवपूर्वक पद्धतीने विटंबना केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. राज्यातील धर्मविरोधी, देवविरोधी आणि वारकरीविरोधी असल्याने समाजकंटांची अशी हिंमत व्हायला लागली आहे. म्हणून आमचं पोलिसांकडे मागणं आहे की या दोषींना तातडीने शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. हे झालं नाही तर महापालिकेच्या मुख्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन करु,” असा इशारा दिला भोसले यांनी दिला आहे. तसेच या शिल्पाची तातडीने दुरुस्तीसुद्धा करण्यात यावी असंही भोसले म्हणालेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varkari monument was vandalized by 2 people in dahisar scsg
First published on: 12-10-2021 at 15:37 IST