राज्यात करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमायक्रॉन विषाणू सापडलेल्या मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार की नाही हाही प्रश्न उपस्थित झालाय. त्यावर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षा गायकवाड म्हणाल्या, “आम्ही जेव्हा नियमावली बनवली तेव्हा प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करून नियम बनवले. आम्ही टास्क फोर्ससोबत सातत्याने बोलत आहोत. ही नियमावली टास्क फोर्सला देखील पाठवली. त्यावर चर्चा झाली आणि मग ही नियमावली (एसओपी) निश्चित झाली. याशिवाय काही निर्णय घ्यायचा झाला तर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. परीक्षा असो की इतर गोष्टी आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. त्यानुसारच भविष्यात निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

“मुंबई-पुणे या शहरांच्या शाळेत १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू”

“आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी शाळा बंद करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले. शाळा सुरू करायची की नाही याचाही निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे या शहरांच्या शाळेत १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत विचार होत आहे. हे सर्व लक्षात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा : राज्यात उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, शाळांसाठीचे नवे १५ सरकारी नियम एका क्लिकवर

“आपण सर्वांनी काळजी घेत सावधानतेने वागलं पाहिजे. करोनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे,” असं आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केलं.

शाळांसाठीचे नवे १५ सरकारी नियम

१. शाळा स्तरावर शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी यासाठी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अनौपचारिक स्वागत करावे.

२. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा भेटींचे नियोजन करुन त्याची एक प्रत प्राथमिक/माध्यमिक शिक्षण संचालनालयाला द्यावी.

३. शाळा भेटीचे फोटो, व्हिडीओ आपल्या अथवा आपल्या सहकाऱ्याच्या फेसबुक/ इन्स्टाग्राम/ ट्विटर यापैकी एका किंवा सर्व समाजमाध्यमावर पोस्ट कराव्यात. पोस्टसोबत आपले नाव, पद, जिल्हा, तालुका, भेट घेतलेल्या शाळेचे नाव, यु डायस क्रमांक, भेटीचे दिनांक व वेळ टेक्स्ट तपशील देखील अपलोड करावा.

४. फेसबुक/ इन्स्टाग्राम/ ट्विटर या समाज माध्यमावर पोस्ट करताना ती Public असावी. तसेच फेसबुकवर पोस्ट करताना Story मध्ये शेअर न करता Wall वर शेअर करण्यात यावी.

५. भेटीच्या फोटोसोबत आपण आपल्या भेटीचा / शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडीओ पोस्ट करताना तो जास्तीत जास्त २ ते ३ मिनिटांपर्यंतचा असावा. फोटो व व्हिडीओ सुस्पष्ट असेल याची काळजी घ्यावी.

६. समाजमाध्यमावर पोस्ट करताना #MVMJ2021, #शिक्षणोत्सव या हॅशटॅगचा (#HASHTAG) वापर करावा.

७. पोस्ट करताना फेसबुकवर @SCERT,Maharashtra , @thxteacher, ट्विटरवर @scertmaha , @thxteacher आणि इंस्टाग्रामवर @scertmaha , @thankuteacher यांना टॅग करावं. पोस्ट Public असावी.

८. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. त्याचे देखील फोटो सूचनांप्रमाणे अपलोड करण्यावेत.

९. आपण पोस्ट केलेली समाजमाध्यमावरील पोस्ट कॉपी करून घ्यावी आणि https://scertmaha.ac.in/mvmj या प्रणालीवर जाऊन आवश्यक तपशील भरून सबमिट करण्यात यावी.

१०. शिक्षण अधिकाऱ्यांनी आपल्या भेटीची नोंद राज्यस्र्तरीय प्रणालीवर करण्यात येईल.

११. शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक देखील आपल्या शाळेतील शिक्षणोत्सवाचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करू शकतात.

१२. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शालेय गणवेश वाटप करावे.

१३. शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राधान्यानं लसीकरण करुन घ्यावं. लसीकरण झालं नाही या कारणास्तव अनुपस्थित राहता येणार नाही. विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांची १०० टक्के हजेरी असावी. लसीकरण झालंय त्यांना कोरोना चाचणीचं बंधन नसेल,इतरांना ही चाचणी करावी लागेल.

१४. मुख्यमंत्र्यांचं ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ सर्व शिक्षकांनी पाहावा. विद्यार्थ्यांनाही हा कार्यक्रम दाखवावा.

१५. ग्रामीण भागात १ ली ते चौथी आणि शहरी भागात १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करावं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varsha gaikwad comment on school opening decision amid corona omicron infection pbs
First published on: 06-12-2021 at 14:41 IST