मुंबई :भीमा कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी कवी वरवरा राव (८२) यांनी अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी शुक्र वारी उच्च न्यायालयात धाव घेतली. राव यांच्या याचिकेवरील सुनावणीपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, अशी हमी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) न्यायालयाला दिली आहे.

आरोग्य समस्यांच्या कारणास्तव न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात राव यांना सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच अंतरिम जामिनाचा कालावधी संपण्यापूर्वी त्यांनी विशेष न्यायालयासमोर शरणागती पत्करावी वा जामिनाच्या मुदतवाढीसाठी अर्ज करावा, असेही स्पष्ट केले होते.

राव यांच्या अंतरिम जामिनाची मुदत शनिवारी संपत आहे. त्यामुळे त्यांनी अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर राव यांच्या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाचे कामकाज संपल्याने ही सुनावणी होऊ शकली नाही. तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांच्या वकिलांतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली. न्यायालयाने याचिकेची दखल घेत त्यावर सोमवारी सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत राव यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश एनआयएला देण्याची विनंती राव यांच्या वकिलांनी केली. तशी हमी एनआयएतर्फे देण्यात आली आहे.