scorecardresearch

वसई-कल्याण प्रवास आता जलमार्गानेही; सागरमाला’अंतर्गत ५० किलोमीटरचा प्रकल्प, चार जेट्टींना मंजुरी

भाईंदर, वसई, डोंबिवली आणि कल्याण येथील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने वसई-कल्याण जलमार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगल हनवते

मुंबई : भाईंदर, वसई, डोंबिवली आणि कल्याण येथील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने वसई-कल्याण जलमार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सागरमाला’ योजनेंतर्गत वसई-ठाणे-कल्याण असा ५० किमीचा जलमार्ग विकसित करून जलवाहतुकीला चालना देण्यात येणार आहे.

 मुंबई महानगर प्रदेशातील भाईंदर, वसई, डोंबिवली, कल्याण ही शहरे झपाटय़ाने विकसित होत असून, तेथील लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. परिणामी, या शहरांत वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. त्यावर उपाय म्हणून जलवाहतुकीला चालना देण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला आहे. त्यानुसार ‘सागरमाला’ योजनेंतर्गत वसई ते कल्याण असा ५० किमीचा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून, हा जलमार्ग ‘राष्ट्रीय जलमार्ग-५३’ या नावाने ओळखला जाणार आहे.

 या प्रकल्पांतर्गत भाईंदर ते कल्याणदरम्यान १० जेट्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती सागरी मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. वसई, भाईंदर (जैसल पार्क), घोडबंदर, नागलाबंदर, कोलशेत, काल्हेर, पारसिक, अंजूरदिवे, डोंबिवली आणि कल्याण या १० ठिकाणच्या जेट्टींचा बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी भाईंदर, काल्हेर, कोलशेत आणि डोंबिवली या चार जेट्टींच्या कामाला केंद्राची मंजुरी मिळाली आहे. आता ‘सीआरझेड’ची परवानगी घेऊन लवकरात लवकर या कामांना सुरूवात करण्याचे मंडळाचे नियोजन असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. भाईंदर येथे रो-रोसाठी एक जेट्टी बांधण्यात आली आहे. आता प्रवासी जलवाहतुकीसाठी भाईंदरमधील जैसल पार्क येथे आणखी एक जेट्टी उभारण्यात येणार आहे. या चार जेट्टींच्या कामासाठी ९९ कोटी ६८ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, या निधीस १५ फेब्रुवारीला मान्यता मिळाली आहे. ‘सागरमाला’ योजनेनुसार यातील ५० टक्के निधी केंद्र सरकारकडून तर ५० टक्के निधी राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. या चारही जेट्टींच्या कामाला पावसाळय़ात सुरूवात करण्यात येण्याची शक्यता असून, दोन वर्षांत जेट्टींच्या बांधणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याच वेळी उर्वरित सहा जेट्टींच्या प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. मात्र ही कामे सुरू होण्यास किती काळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

प्रवास सुकर

या प्रकल्पातअंतर्गत १० जेट्टी उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील चार जेट्टींच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. हा सुमारे ५० किलोमीटरचा जलमार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर भाईंदर -कल्याण हे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प भाईंदर, वसई, डोंबिवली, कल्याणवासीयांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasai kalyan journey water project under sagarmala approval jetties ysh

ताज्या बातम्या