वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक १४ जूनला होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी केली. गेली दहा वर्षे एकहाती सत्ता भोगणाऱ्या आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असून, पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे.
वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीकरिता २२ ते २९ मे या काळात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ जूनपर्यंत आहे. मतमोजणी १६ जूनला होईल. वसई-विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीत वसई आणि नालासोपारा या दोन्ही मतदारसंघांतून ठाकूर पिता-पुत्र निवडून आले होते. सर्वच राजकीय पक्षांबरोबर ठाकूर यांचे सलोख्याचे संबंध लक्षात घेता वसईत त्यांच्या जहागिरीला आव्हान देण्याचा फारसा प्रयत्न होत नाही.