scorecardresearch

वसई-विरारची तहान मार्चपासून भागणार, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार

सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून मार्चमध्ये हा टप्पा कार्यान्वित होणार आहे.

surya water project
सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार

मुंबई : मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची तहान भागविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून मार्चमध्ये हा टप्पा कार्यान्वित होणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास वसई-विरार पालिका क्षेत्राला १८५ एमएलडी क्षमतेने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईने हैराण झालेल्या वसई-विरारकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एमएमआरडीएकडून  सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे काम २०१७ पासून सुरू असून त्यासाठी  १३२५.७८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाअंतर्गत ४०३ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येत आहे. काम सुरु झाल्यापासून ३४ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांनी विलंब झाल्याने हा प्रकल्प लांबला. मागील काही माहिन्यांपासून महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या निर्देशानुसार कामाचा वेग वाढविण्यात आला. त्यानुसार दोन्ही टप्प्याचे काम वेगात सुरू असून आजच्या घडीला एकूण प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.  प्रकल्पातील इनटेक स्ट्रक्चरचे ९८ टक्के  आणि जलशुद्धीकरण केंद्राचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील लोकल वेळ दर्शक सव्वा तास बंद

या प्रकल्पाअंतर्गत एकूण ८८ किलोमीटरची जलवाहिनी टाकली जात आहे. तसेच मेंढवणखिंडीत बोगदा बांधण्यात आला आहे. तुंगारेश्वर बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे.  मार्चमध्ये वसई-विरारला पाणी पुरवठा करणारा पहिला टप्पा कार्यान्वित केला जाईल अशी माहिती श्रीनिवास यांनी दिली.  दुसरा टप्पाही पुढील काही महिन्यात पूर्ण करुन तोही कार्यान्वित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पहिला टप्पा सुरु झाल्यास वसई-विरार क्षेत्राला तर दुसरा टप्पा कार्यान्वित झाल्यास मीरा-भाईंदर क्षेत्राला मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 11:43 IST
ताज्या बातम्या