विधान परिषदेचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांनी बुधवारी सकाळी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमागे नक्की काय कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, भेटीनंतर वृत्तवाहिन्यांशी बोलताना डावखरे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. भेटीमध्ये उद्धव ठाकरे आणि डावखरे यांच्यात काय चर्चा झाली, हे समजलेले नाही.
काही महिन्यांपूर्वीच ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वसंत डावखरे विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांत पुन्हा एकदा आव्हाडांचीच सरशी झाली होती. डावखरेंच्या समर्थकांना डावलून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाण्याचे अध्यक्षपद आव्हाडसमर्थक नजीब मुल्ला यांच्याकडे सोपवल्याने डावखरे गटाला आणखी धक्का बसला होता. शहराध्यक्ष निवडीसंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत डावखरेसमर्थकांनी आव्हाडांच्या निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडून आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, हे आरोप डावलून पवारांनी मुल्ला यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. त्यामुळे पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर येऊ लागले होते. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे.