मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना नवे प्रयोग, नव्या ज्ञानाची माहिती व्हावी म्हणून सुरू जून १९६५ मध्ये शेतकरी मासिक सुरू केले. गत ६० वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी सुरू असलेले देशातील हे एकमेव नियमित प्रकाशन आता कृषी विभागाची अनास्था, ठेकेदाराची मनमानी आणि दर्जाहीन झाल्याने मरणपंथाला लागले आहे.

कृषी विभागाच्या अनस्थेमुळे मासिकाचे काम ठेकेदाराला दिले गेले आहे. गत दोन – तीन वर्षांपासून शेतकरी मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या लेख व माहितीचे व्यवस्थित संपादन, शुद्धलेखन तपासणी होत नाही. कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांचे कालबाह्य, तोच तो मजकूर असलेले लेख अंकात प्रसिद्ध होत आहेत. ठेकेदाराकडे कंत्राटी काम करणारा डीटीपी ऑपरेटरच संपादक म्हणून काम पहात आहे. हे अत्यंत गंभीर आहे. शासनाने हे काम बाह्यस्त्रोताद्वारे (आऊटसोर्स) करून घेताना ज्या अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत, त्याचा भंग होत आहे.

या शिवाय संबंधित मुद्रकाकडून गेल्या काही वर्षांपासून अंकाची वेळेवर छपाई न करणे, अंक वेळेत पोस्टात न टाकणे व पर्यायाने शेतकऱ्यांना मासिक दोन – तीन महिने उशिरा मिळणे, असे अनेक प्रकार झाले आहेत. यासाठी संबंधित मुद्रकाला दंडही आकारण्यात आला आहे. असे असताना संबंधित मुद्रकालाच गेली सुमारे १२ वर्षे सातत्याने छपाईचे काम मिळत आहे. नव्या करारानुसार संबंधित मुद्रकाला पुन्हा दोन वर्षांसाठी छपाईचे काम मिळाले आहे. शेतकऱ्यांकडून शेतकरी मासिकाची आगाऊ वर्गणी घेतली जाते. अलिकडे शेतकऱ्याने एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेतला तर त्याच्याकडून सक्तीने वर्गणीचे पैसे घेऊन अधिकारी अंक नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करतात.

वसंतरावांनी दूरदृष्टीने साधला कृषी विस्तार

शेतीचा विकास करण्यासाठी कृषी संशोधन, कृषी विषयक योजना आणि संशोधित तंत्रज्ञान प्रभावी रीतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जून १९६५ मध्ये शेतकरी मासिकाची सुरुवात करण्यात आली. हे मासिक वसंतराव नाईक यांच्या कल्पनेतून जन्माला आले. आज त्या मासिकाला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याच्या कृषी विकासातील महत्वपूर्ण बाबींचा परामर्श घेण्यासाठी शेतकरी मासिका व्यतिरिक्त कोणतेही अन्य चांगले साधन नव्हते. हे मासिक म्हणजे कृषी विस्ताराचे अद्वितीय साधन ठरले होते. त्यामुळे त्यांनी मासिकाच्या दर्जा बाबत तडजोड केली नाही. पहिल्यांदा मासिकाच्या संपादनाची जबाबदारी डॉ. वा. ब. राहुडकर यांच्याकडे होती. डॉ. राहुडकर त्या वेळीचे एम. एस्सी. अॅग्री, एम. ए. (अमेरिका) होते, त्यांनी अॅग्रोनॉमीमध्ये पीएच.डी. पदवी मिळविली होती.

मासिकाचा खप दोन लाखांवरून ४० हजारांवर

शेतकरी मासिक वर्गणीदारांनी जुलै १९७१ मध्ये ६३,००० चा टप्पा ओलांडला तर सप्टेंबर १९७३ मध्ये १ लाख, सप्टेंबर १९८१ मध्ये १.५० लाख व डिसेंबर १९९३ मध्ये २.०० लाख वर्गणीदारांपर्यंत हे मासिक पोहोचत होते. २०११ – १२ मध्ये हे मासिक स्पर्धात्मक रीत्या व्यावसायिक पद्धतीने चालावे यासाठी संपादनाचे काम बाह्यस्त्रोताद्वारे करुन देण्यात आले. उज्ज्वला बाणखेले या उपसंचालक तथा संपादक होत्या. त्या पूर्वी विनय कुमार आवटे यांनी मासिकासाठी चांगले काम केले होते. मासिकाचा खप दोन लाखांवर गेला होता, आता रडत खडत ४० हजारांवर आले आहे. दर्जाहीन मजकूर, संपादनाचा अभाव, अंक महिना – महिना शेतकऱ्यांना उशिरा जाणे, अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मासिक आता शेतकऱ्यांच्या मनातून उतरले आहे.

वसंतराव नाईक, पी. के. सावंत मासिकात नियमित लिहायचे

शेतकऱ्यांचे हक्काचे मुखपत्र असा एकेकाळी शेतकरी मासिकाचा लौकिक होता. स्वत: वसंतराव नाईक, तत्कालीन कृषिमंत्री पी. के. सावंत मासिकात नियमित लिहायचे. शेतीविषयक जगभरातील नव्या तंत्रज्ञानाची माहिती प्रसिद्ध होत असे. अनेक योजना मासिकाने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविल्या. कृषी विस्ताराचे हे देशातील अनोखे उदाहरण होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनीही या मासिकाची स्तुती केली होती. आता या मासिकाची अक्षम्य हेळसांड सुरु आहे. वर्गणी भरूनही शेतकऱ्यांना मासिक वेळेत मिळत नाही. छपाई कंत्राटदारच मासिकाचे संपादनही करतो. एकेकाळी दोन लख खप असलेले हे मासिक ४० हजारांवर आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ कृषी अभ्यासक सुनील चव्हाण यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिजिटल स्वरूपात मोफत अंक

डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आल्यापासून लिखित वृत्तपत्रांच्या खपात सुद्धा जवळपास ५० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. सध्या शेतकरी मासिक डिजिटल स्वरूपात मोफत प्रसिद्ध केले जाते. त्यामुळे डिजिटल तंत्रज्ञान स्नेही वाचक वर्ग वाढला आहे. मासिकात अत्यंत दर्जेदार लेख नियमितपणे प्रसिद्ध केले जातात. डिजिटल माध्यमाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.