मुंबई : भारतातील शेतात पिकणाऱ्या फळांचा टिकाऊपणा वाढावा, तसेच यामुळे फळांची निर्यात क्षमता वाढवून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी अणुऊर्जा विभागाच्या वाशी येथील ब्रिट्स ( बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजी ) मोबाईल गॅमा किरणोत्सर्ग प्रणाली विकसित करीत आहे. ही यंत्रणा ट्रकवर बसवली जाणार असून या तंत्रज्ञानामुळे फळातील हानिकारक जंतू आणि किडे नष्ट होणार आहेत. तसेच फळांचा टिकाऊपणा वाढण्यास मदत होणार आहे.

देशभरातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या फळांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, अनेक फळांची टिकण्याची क्षमता फारच कमी असल्याने ती काही वेळातच शेतकऱ्यांना बाजारापर्यंत पोहोचवणे गरजेचे असते. अशाच फळांवर प्रक्रिया करून त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी ब्रिट्सकडून ‘गॅमा किरणोत्सर्गावर’ आधारित एक नवी प्रणाली विकसित केली जात आहे. ही नियंत्रित मोबाईल गॅमा किरणोत्सर्ग प्रणाली ट्रकवर बसवली जाणार असून ती शेताजवळ किंवा बाजारात सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतातून काढलेल्या फळांचा टिकाऊपणा वाढणार असून अशा फळांची निर्यातही करता येणे शक्य होणार आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या प्रणालीच्या प्रारूपाला मंजुरी मिळाली असून ही प्रणाली यावर्षी किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी उपलब्ध होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे फळउत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

या तंत्रज्ञानामुळे वाहतुकीदरम्यान किंवा साठवणूक करताना होणारे नुकसानही कमी होणार आहे, असे हे गॅमा किरणोत्सर्ग तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले. याचा फायदाही शेतकरी आणि ग्राहक अशा दोघानांही होणार आहे. ही यंत्रणा ट्रकवर बसवली जाणार असल्याने ती थेट शेतांमध्ये, संकलन केंद्रात, तसेच फळ बाजारांमध्ये नेता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे फळे दूरवरच्या प्रक्रिया केंद्रापर्यंत नेण्याची गरज कमी होणार आहे.

कापणीनंतर लगेच ही प्रक्रिया केल्यामुळे फळे जास्त काळ ताजी राहणार आहेत. तसेच या प्रक्रियेमुळे फळांची चव, पोषणमूल्य यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, असेही शास्त्रज्ञांनी सांगितले. अन्न किरणोत्सर्ग तंत्रज्ञानाचा वापर जगभर करण्यात येतो. या आधारे कीड नियंत्रण, अलगीकरण प्रकिया आणि कृषी उत्पादने टिकवण्याची क्षमता वाढविण्यासाठी केला जातो. तसेच भारतातही या तंत्रज्ञानासाठी कडक नियम असून त्यावर नियंत्रण ठेवले जाते.