मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) मोहिमेदरम्यान मतदार याद्यांतून कोणत्याही नागरिकाचे नाव वगळण्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगाला मज्जाव करण्याचे आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. एसआयआरच्या वैधतेला आव्हान देणारे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने प्रकरण ऐकण्यास आणि याचिकाकर्त्यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला.
एसआयआर प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जाण्याची शक्यता वर्तवून, ‘वंचित बहुजन आघाडी’च्या दोन नेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी, एसआयआरच्या वैधतेशी संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून ८ ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. शिवाय, एसआयआरशी संबंधित प्रकरण न ऐकण्याचे अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने ११ सप्टेंबर रोजी देशातील विविध उच्च न्यायालयांना दिले आहेत. हा आदेश अद्यापही लागू आहे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने वरिष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. याशिवाय, याच कारणास्तव देशातील विविध उच्च न्यायालयांनी सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईपर्यंत थाबण्याची भूमिका घेतल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दुसरीकडे, याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या युक्तिवादाला विरोध केला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचा संबंधित अंतरिम आदेश महाराष्ट्राला लागू होत नसून आपली याचिका वेगळी असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत आधीच प्रतिबंधात्मक आदेश आहेत. समांतर प्रकरण चालवून काहीही साध्य होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाला आधी या प्रकरणावर सुनावणी करू द्या आणि त्यानंतर आम्ही त्यावर विचार करू, असे मुख्य न्यायमूर्तींनी म्हटले आणि प्रकरणाची सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली. त्यानंतर, पुढील सुनावणीपर्यंत एकाही मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येऊ नये, असा अंतरिम दिलासा देण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. त्यालाही न्यायालयाने नकार दिला व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना असा दिलासा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि न्यायालयीन शिष्टाचाराचे पालन केले जाईल, असे नमूद करून न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी तहकूब केली.
प्रकरण काय ?
याचिकाकर्त्यांनी घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कागदपत्रे गोळा करण्याच्या पद्धतीवर आणि मतदारांचे गैरहजर, स्थलांतरित, मृत, दुप्पट नोंदणी व अ-संकलनीय गणना अर्ज यासारख्या श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यावर याचिकेद्वारे आक्षेप नोंदवले आहेत. तसेच, राज्यात एसआयआर प्रक्रिया राबवण्याबाबतचा आदेश आणि त्यामागील नोंदवलेली कारणे जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रक्रियेची कार्यपद्धती आणि कायदेशीर आधार याबाबत पारदर्शकता असावी आणि पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.
