मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या वर्सोवा-दहिसर-भाईंदर या उत्तर सागरी किनारा मार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या प्रकल्पामुळे अंधेरीतील वर्सोवा ते ठाणे जिल्हातील भाईंदरपर्यंतचा दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने सागरी किनारा मार्गाचे काम हाती घेतले असून मरीन ड्राइव्ह-वरळीदरम्यानच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या उत्तर मुंबईतील भागावर आता मुंबई महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. वर्सोवा-दहिसर-भाईंदर असा हा सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिकेतर्फे उभारला जात आहे.

दहिसर-भाईंदर उन्नत मार्गही मुंबई महापालिकेतर्फे उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामांची नुकतीच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पाहणी केली.

६० किमी लांबीचा रस्ता

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा आंतरबदल व जोडरस्त्यांसह सुमारे ६० किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून, त्याद्वारे अंधेरीतील वर्सोवा व भाईंदर हे भाग किनारा रस्त्याने जोडले जाणार आहेत.

गुंतागुंतीचा प्रकल्प

वर्सोवा-दहिसर-भाईंदर प्रकल्पाची कामे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ’ व दहिसर-भाईंदर जोडरस्ता (डीबीएलआर) अशा सात टप्प्यांत विभागण्यात आली आहेत. या प्रकल्पात दुहेरी उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ते, दोन केबलआधारित पूल, चार बास्केट पूल, सुमारे १५ मीटर व्यासाचे दोन जुळे बोगदे व दहा आंतरबदल उभारण्यात येणार आहेत.

मालाड चारकोपदरम्यान बोगदे

मालाड-चारकोपदरम्यान ७.८ किमीचे जुळे बोगदे तयार केले जाणार आहेत. चारकोप येथे बोगद्याच्या बांधकामासाठी शाफ्ट तयार करण्यात येणार असून त्यासाठी ६५ मीटर बाय ४० मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर खोदकाम सुरू आहे. बोगदा खणन यंत्राचे (टीबीएम) सुटे भाग डिसेंबर २०२६ मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत यंत्राच्या सुट्या भागांची जुळवाजुळव पूर्ण करून पहिल्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात येणार आहे.

दुसऱ्या बोगद्यासाठी यंत्राची जुळवाजुळव जून २०२७ मध्ये पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. किनारा रस्ता प्रकल्पातील सर्व कामे निर्धारित कालावधीत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीच्या वेळी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मांतय्या स्वामी, कार्यकारी अभियंता वैभव गांधी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नरिमन पॉईंटहून थेट भाईंदर

नरिमन पॉईंट-भाईंदर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईची पश्चिम किनारपट्टी जोडली जाणार आहे. नरिमन पॉईंट-वरळी दक्षिण सागरी किनारा मार्ग तयार झाला आहे. वरळी-वांद्रे सागरी सेतूही आहे. वांद्रे-वर्सोवा भाग राज्य सरकारच्या प्राधिकरणामार्फत उभारला जाणार आहे. तर वर्सोवा-दहिसर- भाईंदर टप्पा महापालिका बांधणार आहे. सगळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंटहून थेट भाईंदरपर्यंत जाता येणार आहे.