मुंबई : मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीचा जलवाहतुकीसाठी अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने हालचाली सुरू केल्या आहेत. पश्चिम उपनगरातील वर्सोवा येथून थेट अलिबागजवळील मांडवा येथे जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे. या मार्गाची चाचपणीही सुरू आहे. ही सेवा प्रत्यक्षात आल्यास वांद्रे, जुहू, अंधेरी, वर्सोवा आणि परिसरातील प्रवाशांना दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया किंवा भाऊचा धक्का गाठण्याची गरज पडणार नाही.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. या परिसरात राहणाऱ्या अनेक उद्योजक, व्यावसायिक आणि सिनेसृष्टीतील व्यक्तींची अलिबाग परिसरात बंगले किंवा फार्महाऊस आहेत. सध्या अलिबागला जाण्यासाठी त्यांना रस्त्याने मोठा प्रवास करावा लागतो. दुसरा मार्ग गेटवे ऑफ इंडिया गाठून तेथून जलवाहतूक करावी लागते. पश्चिम उपनगरातूनच जलवाहतूक उपलब्ध झाल्यास हा वेळ आणि प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
बंदर विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा ते मांडवा जलवाहतूक सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सविस्तर आराखडा तयार करावा, अशा सूचना केल्या आहेत. पश्चिम उपनगर आणि अलिबाग यांच्यात थेट जलमार्ग निर्माण करण्यामागे प्रवासी वाहतुकीबरोबरच पर्यटनाला चालना देण्याचाही उद्देश आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने यापूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी दहा मार्गांची संकल्पना मांडली आहे. त्यामध्ये बोरीवली मालाड, वर्सोवा, वांद्रे हा पश्चिम किनारपट्टीवरील मार्ग तसेच वांद्रे,वरळी,नरिमन पॉइंट या मार्गांचा समावेश आहे. या मार्गांच्या माध्यमातून भविष्यात मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबई–मांडवा जलवाहतूक यापूर्वीपासून सुरू आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा हा प्रवास साधारण ४५ मिनिटे ते एक तासात पूर्ण होतो. रस्त्याने मुंबई ते मांडवा-अलिबाग प्रवासाला तुलनेने दोन ते तीन तास लागतात. रो-रो आणि रो-पॅक्स सेवांमुळे प्रवाशांसोबत वाहनेही समुद्रमार्गे नेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पश्चिम उपनगरातून थेट मांडव्यापर्यंत जलवाहतूक सुरू झाल्यास या सेवेला मोठी मागणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
या प्रस्तावामुळे सर्वसामान्य प्रवाशांना, विशेषतः पश्चिम उपनगरातील नागरिकांना अलिबागकडे जाण्यासाठी पर्यायी आणि वेळ वाचविणारा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. त्याचवेळी अलिबागमधील पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि मुंबई-अलिबागदरम्यानची आर्थिक व सामाजिक देवाणघेवाण वाढण्यासही मदत होणार असल्याचे राणे यांनी सांगितले. प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यापूर्वी जेट्टीची उपलब्धता, समुद्री वाहतुकीची सुरक्षितता, प्रवासी क्षमता, हवामान आणि पर्यावरणीय बाबींचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.
