मुंबई : खासगी वैद्यकीय, तंत्रशिक्षण आणि कृषी महाविद्यालयांमध्ये सर्वसाधारण कोट्यासाठी निश्चित केलेल्या शुल्काच्या तीनपट शुल्क आकारण्यात येते. त्याचवेळी राज्यातील विनाअनुदानित खासगी पशुवैद्यकीय आणि दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयांमधील व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सर्वसाधारण कोट्यासाठी निश्चित केलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारण्यास शुल्क नियामक प्राधिकरणाने परवानगी दिली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सुरू होणाऱ्या बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच. आणि बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. त्याचवेळी, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठी आकारण्यात येणारे शुल्क प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न कायमस्वरूपी विनाअनुदानित खासगी महाविद्यालयांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच. आणि बी.टेक. (डेअरी टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. मात्र, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठी शुल्क निश्चित झाले नसल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे विद्यापीठाने शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी शुल्क नियामक प्राधिकरणाला केलेल्या विनंतीनुसार व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सर्वसाधारण कोट्यासाठी निश्चित केलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारण्यास परवानगी दिली आहे.
सर्वसाधारण आणि व्यवस्थापन कोटा प्रमाण ५०:५० निश्चित
खासगी वैद्यकीय, तंत्रशिक्षण आणि कृषी महाविद्यालयांमध्ये सर्वसाधारण किंवा शासन कोटा आणि व्यवस्थापन कोटा यांचे प्रमाण प्रामुख्याने ८०:२० असते. काही व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सर्वसाधारण, व्यवस्थापन आणि अनिवासी भारतीय (एनआरआय) कोट्यांचे प्रमाण ८०:१५:५ असेही असते. खासगी पशुवैद्यकीय आणि दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयांसाठी सर्वसाधारण कोटा आणि व्यवस्थापन कोटा यांचे प्रमाण ५०:५० निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे व्यवस्थापन कोट्यात तीनपट शुल्क आकारण्याची परवानगी दिल्यास या महाविद्यालयांच्या उत्पन्नाचे गणित वेगळे राहील, तसेच या महाविद्यालयांना इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत समतुल्य महसूल मिळावा, या उद्देशाने शुल्क दुप्पट निश्चित करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
शुल्क प्रवेशापूर्वी जाहीर करावे
प्राधिकरणाने एखाद्या कोट्यासाठी शुल्काच्या विशिष्ट कमाल मर्यादेपर्यंत आकारणीला परवानगी दिली असली, तरी प्रत्येक संस्थेला त्या कमाल मर्यादेइतके शुल्क आकारणे बंधनकारक नाही. संस्था त्यापेक्षा कमी शुल्क आकारू शकते. मात्र, प्रत्यक्षात किती शुल्क आकारले जाणार आहे, हे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर स्पष्टपणे प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे.
अतिरिक्त शुल्काचा हिशेब दाखवणे बंधनकारक
व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त शुल्काची संपूर्ण रक्कम महाविद्यालयाच्या उत्पन्न व खर्च विवरणपत्रात दाखवणे बंधनकारक आहे. ही रक्कम संस्थेच्या लेखा नोंदींमध्येही योग्य प्रकारे नमूद करावी लागेल. अतिरिक्त शुल्क प्रत्यक्षात वसूल करूनही उत्पन्न व खर्च विवरणपत्रात कमी दाखवल्याचे आढळल्यास, शुल्कनिश्चिती करताना संबंधित आर्थिक वर्षातील घोषित उत्पन्नाचा विचार केला जाईल.
शुल्काचे गणित कसे ठरले
– प्राधिकरणाने शुल्कनिश्चिती करताना विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आणि विविध कोट्यांतून मिळणारे उत्पन्न यांचा विचार केला. एखाद्या खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेशक्षमता १०० विद्यार्थी असल्यास, त्यापैकी ५० विद्यार्थी सर्वसाधारण कोट्यातून आणि ५० विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतील.
– सर्वसाधारण कोट्यातील ५० विद्यार्थ्यांकडून मूळ शुल्काच्या एकपट दराने एकूण ५० पट शुल्क मिळेल. तर व्यवस्थापन कोट्यातील ५० विद्यार्थ्यांकडून मूळ शुल्काच्या दुप्पट दराने एकूण १०० पट शुल्क मिळेल. अशा प्रकारे १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेसाठी महाविद्यालयाला एकूण १५० विद्यार्थ्यांच्या मूळ शुल्काएवढा महसूल मिळू शकेल.
– अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ८०:१५:५ या प्रमाणानुसार सर्वसाधारण कोट्यातील ८० विद्यार्थ्यांकडून ८० पट, व्यवस्थापन कोट्यातील १५ विद्यार्थ्यांकडून ४५ पट आणि एनआरआय कोट्यातील पाच विद्यार्थ्यांकडून २५ पट शुल्क मिळते. या तिन्ही कोट्यांतून मिळणारे एकूण शुल्क १५० पट होते. या तुलनेत पशुवैद्यकीय आणि दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयांसाठी व्यवस्थापन कोट्यात दुप्पट शुल्काची मर्यादा योग्य असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
