He-Man of Bollywood Dharmendra Death : धर्मेद्र हे माणूस म्हणून सर्वार्थाने वेगळे होते. प्रचंड लोकप्रियता मिळूनही त्यांच्या स्वभावात किंचितही फरक पडला नाही. आयुष्याच्या अखेपर्यंत प्रत्येक लहान-मोठया माणसाशी ते प्रेमाने वागले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वगुणसंपन्न अभिनेते म्हणून ते नावाजले होते.

लोकप्रिय नटामागे लपलेला एक अतिशय मनमिळाऊ, सगळयांना सांभाळून घेणारा, श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाशी तितक्याच मायेने वागणारा माणूस म्हणून धर्मेद्र यांच्या खूप आठवणी माझ्या मनात आहेत. एक कलाकार म्हणून ते उत्तम होते, पण सेटवरचे लोक असोत वा चाहत्यांची गर्दी.. त्या गराडयात मला कायम त्यांच्यातला प्रेमळ सहकारीच अनुभवायला मिळाला. ते कायम आपल्या तत्त्वांना  धरून राहिले आणि ते नेहमी त्याविषयी खुलेपणाने बोलत. स्वत:शी सच्चेपणाने वागणारा आणि कायम मातीशी नाळ जोडून राहिलेला हा कलाकार कितीही लोकप्रिय कलाकार म्हणून नावारूपाला आला तरी त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही.

धर्मेद्र यांनी मीना कुमारी यांच्याबरोबर ‘मजली दीदी’, जया बच्चन यांच्याबरोबर ‘गुड्डी’ आणि सायरा बानो यांच्याबरोबर ‘चैताली’ अशा त्यांच्या पडद्यावरच्या रूढ प्रतिमेच्या अगदी विरुद्ध विविधांगी भूमिका केल्या. हिंदी व्यावसायिक चित्रपटांत अगदी विरुद्ध टोकांच्या भूमिका करणारे धर्मेद्र आपल्या चित्रपटांमध्ये मात्र वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या भूमिका करतात म्हणून हृषीकेश मुखर्जी कायम त्यांची फिरकी घेत. ‘तू धर्मेद्र आहेस, तू बलदंड नायक आहेस हे सगळे विसर आणि इथे तू एक खूप चांगली भूमिका करतो आहेस’ हे लक्षात ठेव असे हृषीकेश मुखर्जी त्यांना कायम सांगत असत. ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ करत असताना मी दोन शिफ्टमध्ये काम करत होते.

सकाळी ७ ते दुपारी २ मी वेगळया चित्रपटाचे चित्रीकरण करत होते, तर दुपारी २ ते रात्री १० या वेळेत मी ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ हा चित्रपट करत होते. एकदा ‘छलका ये जाम’ या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते आणि दहा वाजून गेले तरी आमचे चित्रीकरण सरायचे नाव घेत नव्हते. दिग्दर्शकाने मला दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितले, जेणेकरून चित्रीकरण पूर्ण होईल. त्यावेळी मी दोन वेगवेगळया चित्रपटांसाठी काम करत होते. त्यातच माझे पती मन्सूर अली खान पतौडी यांचा कसोटी सामना पाहण्यासाठी कोलकत्त्याला जावे लागणार होते. त्यावेळी मी धर्मेद्र यांना आपण आजच उशिरापर्यंत चित्रीकरण गाणे पूर्ण केले तर चालेल का? असे विचारले आणि त्यांनीही पूर्ण सहकार्य करत ते चित्रीकरण पूर्ण केले.

सकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही चित्रीकरण करत होतो. त्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य केले, तसे आणखी कोणी केले असते असे मला वाटत नाही. यातूनच ते इतरांपेक्षा खूप वेगळे होते हेच खरे.