मुंबई: ऐंशीच्या दशकात गाजलेल्या ‘भारत एक खोज’, ‘वागले की दुनिया’ या दूरचित्रवाणीवरील हिंदी मालिकांतून तसेच चित्रपटांतून घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते सलीम घौस यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि अन्य परिवार आहे.

सलीम घौस यांच्या निधनावर हिंदी चित्रपटसृष्टी आणि मालिकाविश्वातून शोक व्यक्त केला गेला आहे. बुधवारीच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले होते; परंतु गुरुवारी सकाळीच त्यांची प्राणज्योत मावळली. अभिनेते सलीम घौस हे त्यांच्या अभिनयासह, आवाज आणि संवादशैली आणि देहबोलीसाठी ओळखले जायचे. त्यांनी हिंदीसह तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम, इंग्रजी अशा भाषांतील चित्रपटांतून अभिनय केला आहे. १९७८ साली आलेल्या ‘स्वर्ग नरक’ या हिंदी चित्रपटांतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘चरका’ (१९८१), ‘मोहन जोशी हाजिर हो’ (१९८४), ‘सारांश’ (१९८४), ‘त्रिकाल’ (१९८५) असे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.