नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘जनस्थान’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण साधू यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मुंबईत शनिवारी ही घोषणा केली.
१ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे एका समारंभात हा पुरस्कार साधू यांना प्रदान केला जाणार आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. विलास खोले आणि निवड समितीमधील डॉ. अक्षयकुमार काळे, सुनील तांबे, राजन खान, जयंत पवार, सतीश बडवे, मोनिका गजेंद्रगडकर, रेखा साने-इनामदार या सदस्यांनी एकमताने साधू यांची निवड केली असल्याची माहितीही कर्णिक यांनी दिली. हा पुरस्कार दर दोन वर्षांनी देण्यात येत असून आत्तापर्यंत विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल, ना. धों. महानोर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे या १२ जणांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ज्येष्ठ साहित्यिक, कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या नावाने असलेल्या प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी माझी निवड झाली ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. माझ्या साहित्याची नोंद घेऊन या पुरस्कारासाठी माझी निवड केली गेली याचे समाधान आहे.
-अरुण साधू, ज्येष्ठ साहित्यिक