मुंबई : सत्तरच्या दशकात पुरुषांनी तयार केलेल्या स्त्री प्रतिमा वा विचारांना छेद देऊन अत्यंत पारदर्शीपणे आत्मभान आलेल्या स्त्रियांचे भावविश्व कवितेतून रेखाटणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री रजनी परुळेकर यांचे बुधवारी मध्यरात्री गिरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी झोपेतच निधन झाले.

साहित्यविश्वात रजनी परुळेकरांचे योगदान मोलाचे होते. सत्तरच्या दशकापर्यंत साहित्यातून स्त्रीत्वाची अभिव्यक्ती होत नव्हती असे नाही, मात्र त्याला सौंदर्यवाद आणि आत्मकेंद्रीपणाची रूढ चौकट होती. रजनी परुळेकरांनी त्यांच्या कवितेला या चौकटीतून मोकळे केले. अतिशय प्रतिभाशाली आणि काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या या कवयित्रीकडे साहित्यविश्वाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. गेली काही वर्षे एकटय़ाने आणि हलाखीच्या अवस्थेत घालवलेल्या रजनी परुळेकर यांचे जाणेही असेच एकाकी ठरले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या वाडीतील काही व्यक्ती आणि दोन परिचित अशा मोजक्याच माणसांच्या उपस्थितीत गिरगावातील चंदनवाडी स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : आंदोलन वैयक्तिक पातळीवर नेले व फसले

रजनी परुळेकर यांच्या कविता स्त्रीवादी भूमिका मांडणाऱ्या वाटतात, मात्र त्यांच्या कवितांचा अभ्यास केल्यावर स्त्रीच्या जगण्याची काव्यात्म अभिव्यक्ती करताना त्यांचा दृष्टिकोन मानवतावादी असल्याचे लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारी स्त्री ही आधुनिक काळातील स्त्रीच्या जवळ जाणारी होती. त्यांचे ‘दीर्घकविता’, ‘काही दीर्घ कविता’, ‘स्वीकार’, ‘चित्र’, ‘पुन्हा दीर्घ कविता’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ‘दीर्घ कविता’ या संग्रहाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, तर ‘स्वीकार’ या काव्यसंग्रहाला कवी कुसुमाग्रज पुरस्कार आणि ‘चित्र’ या काव्यसंग्रहाला ना. धों. महानोर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.