मुंबई : भावगीतांची सम्राज्ञी ही सार्थ ओळख आयुष्यभर जपलेल्या प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवारी रात्री साडेआठ वाजता वृध्दापकाळामुळे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सात दशकांहून अधिक काळ अत्यंत लोभस, सुमधूर आवाजाच्या बळावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी यावर्षी नव्वदीत पदार्पण केले होते. भावगीतांच्या नभांगणात शुक्रताऱ्यासारखे अढळपद मिळवलेल्या सुमन कल्याणपूर यांंच्या निधनाने भारतीय संगीताच्या सुवर्णयुगातील स्वरतेज निमाल्याची भावना त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून व्यक्त होते आहे.
मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा…
मराठी भाषिकांमध्ये भावगीतांचे एक वेगळे स्थान आहे. या संगीतप्रकाराला ज्यांनी आपल्या अभूतपूर्व स्वरांनी अभिषेक घातला त्यातील एक नाव म्हणजे सुमन कल्याणपूर. त्यांच्या स्वरांनी सात दशकाहून अधिक काळ प्रेक्षकांना एक सुरेख अनुभूती दिली. ‘चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली’, ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपेलेले’, ‘देव माझा विठू सावळा’ या भावमधूर गीतांसह ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’ अशी कैक गाणी आपल्या सुमधुर गायनाने त्यांनी अजरामर केली.
सुमन कल्याणपूर यांचे लग्नाआधीचे नाव सुमन हेमाडी असे होते. बांगलादेशमधील ढाका येथे १९३७ साली त्यांचा जन्म झाला. १९४३ मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आणि तिथून त्यांच्या गायनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. रामानंद कल्याणपुर यांच्याशी लग्न होऊन त्या सुमन कल्याणपुर या नावाने सर्व परिचित झाल्या. त्यांनी पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. १९५४ मध्ये ‘दरवाजा’ चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन केले. सुरुवातीला त्यांना लता मंगेशकर यांच्या गायकीशी साम्य असल्यामुळे काही संगीतकारांनी ‘दुसरी लता’ म्हणून पाहिले, पण त्यांनी कधीही कटुता बाळगली नाही किंवा आक्रस्ताळेपणा केला नाही.
वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी मोहमद शफी यांनी संगीत दिलेल्या ‘मंगु’ या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते. गाण्याचे बोल होते ‘कोई पुकारे धीरे से तुझे’. त्यानंतर त्यांच्या गाण्याची घोडदौड चालुच राहिली. ‘जिथे सागरा धरणी मिळते’ असे म्हणत प्रियकराची वाट बघणारी प्रेयसी, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात’, ‘माहेरी जा सुवासाची कर बरसात’, ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई’, ‘कशी गवळण राधा बावरली’, ‘सांज आली दुरातुनी, क्षितीजाच्या गंधातुनी’, ‘केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर’, ‘केशवा माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘जगी ज्यास कोणी नाहि त्यास देव आहे’, ‘देव माझा विठु सावळा, माळ त्याची माझिया गळा’, ‘उठा उठा चिऊताई’, ‘या लाडक्या मुलांनो या’ अशा त्यांनी गायलेल्या विविध मराठी गाण्यांनी एक काळ गाजवला.
