मुंबई : व्हाईस अ‍ॅडमिरल अजेंद्र सिंग यांनी मंगळवारी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी ते पूर्व विभागाचे प्रमुख होते. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथील गौरवस्तंभ येथे पुष्पहार अर्पण करून जवानांना अभिवादन करून त्यांनी पदभार स्वीकारला. सिंग हे १ जुलै १९८३ पासून नौदलाच्या सेवेत असून दिशानिर्देशाचे तज्ज्ञ आहेत. यूपी सैनिक स्कूल, लखनऊ आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासलाचे ते  माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी वेलिंग्टन येथे स्टाफ कोर्स दरम्यान मद्रास विद्यापीठातून पहिली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यावेळी त्यांना स्कडर पदक प्राप्त झाले. युनायटेड किंगडम येथील क्रॅनफिल्ड विद्यापीठातून त्यांनी २००५ मध्ये ग्लोबल सिक्युरिटीमध्ये पदव्युत्तर पदवीदेखील मिळवली. नौदलाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक उच्च पदे भूषवली आहेत. पवन मोहिमेत आयएनएस कमोर्टाचे आणि विनाशक आयएनएस रणजितचे ते दिशादर्शक अधिकारी होते. त्यांचे चारही ऑपरेशनल कमांड मुंबई येथील जहाजांवर होते. ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी, कोची येथील नेव्हिगेशन अ‍ॅण्ड डायरेक्शन स्कूल आणि डिफेन्स सव्‍‌र्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे डायरेक्टिग स्टाफचे प्रशिक्षकही होते. व्हाईस अ‍ॅडमिरल म्हणून ते २०१५ पासून कार्यरत आहेत.