|| इंद्रायणी नार्वेकर

उद्घाटनानंतर  केवळ दोन आठवडेच धाव

मुंबई : घोड्यांच्या टापांचा टपटप आवाज करत धावणाऱ्या जुन्या काळातल्या ‘व्हिक्टोरिया’ची आठवण करून देणारी, पण विजेवर चालणारी बग्गी मार्च महिन्यात मुंबईत सुरू झाली, पण करोना टाळेबंदीमुळे पहिल्या टप्प्यातल्या बारा बग्गी सध्या जागेवरच थबकल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्च महिन्यात या गाड्यांच्या सफरीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र संध्याकाळी ४ ते पहाटे २ अशी वेळ त्यांना ठरवून देण्यात आल्यामुळे टाळेबंदीचा फटका बसून या बग्गीची रपेट सध्या बंदच पडली आहे.

एकेकाळी मुंबईची ओळख असलेली व्हिक्टोरिया न्यायालयाच्या आदेशानंतर साधारण २०१५ पासून बंद करण्यात आली. घोड्यांवर अत्याचार होतो, या कारणास्तव प्राणिप्रेमींनी आक्षेप घेतल्याने घोड्यांनी ओढली जाणारी व्हिक्टोरिया बंद झाली. इतिहासाच्या पानावरून ती पुसली जाणार, अशी रुखरुख मुंबईकरांना वाटत होती. परंतु व्हिक्टोरिया बग्गीतून फिरण्याचा आनंद अनुभवता यावा, याकरिता एका मराठी माणसाने विजेवर चालणाऱ्या बग्गी तयार केल्या.

मार्च महिन्यात पर्यटकांसाठी या बग्गी सुरू करण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बग्गीला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर पहिल्या टप्प्यात बारा बग्गी दक्षिण मुंबईतील रस्त्यावरून फिरण्यास सज्ज झाल्या. यापैकी सहा बग्गी गेट वे ऑफ इंडिया परिसरातून तर सहा बग्गी नरिमन पॉइंट येथून धावतील, असे नियोजन करण्यात आले होते. या बग्गीतून संध्याकाळी ४ ते पहाटे २ वाजेपर्यंत फिरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार दोन आठवडे या बग्गी सुरू होत्या. मात्र एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टाळेबंदी जाहीर झाली आणि या बग्गीची घौडदौडही थांबली.

पर्यटकांना भर उन्हात मुंबई दर्शन करीत फिरवणे शक्य नसते. तसेच बग्गीतून फिरण्यासारखा माहोल हा संध्याकाळी असतो. पूर्वीच्या व्हिक्टोरियात लोक रात्रीची रपेट मारण्यासाठी येत असत. मात्र संध्याकाळी चार वाजल्यानंतर टाळेबंदीचे निर्बंध लागू असल्यामुळे आम्ही या बग्गी सुरू ठेवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया बग्गी चालवणाऱ्या कंपनीचे केतन कदम यांनी दिली. सध्या या गाड्या पालिकेच्या गॅरेजमध्ये उभ्या ठेवल्या आहेत, मात्र आम्हाला त्याची देखभाल करावी लागत आहे. त्यामुळे उत्पन्न घटलेले असले तरी खर्च मात्र तेवढाच करावा लागतो आहे, असेही त्यांनी सांगितले.

रोजगाराचा प्रश्न

जुन्या व्हिक्टोरिया बंद पडल्यानंतर २५० घोडागाडी चालक बेरोजगार झाले होते. त्यांना या बग्गी चालवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील १२ बग्गीनंतर आणखी ४० बग्गी मुंबईत विविध पर्यटनस्थळी, बोरिवली नॅशनल पार्क, जिजामाता उद्यान परिसरात व अन्य जिल्ह्यांतही सुरू करण्यात येणार होत्या. त्याकरिता ४० बग्गींचे उत्पादनही करण्यात येणार होते. मात्र तेदेखील थांबवण्यात आल्याची माहिती कदम यांनी दिली. तर या बग्गी चालवण्यातून जे उत्पन्न मिळणार होते त्यातील काही हिस्सा कंपनीला व काही हिस्सा या चालकांना मिळणार होता. घोडागाडी बंद पडल्यानंतर अनेक चालक हे रिक्षा, टॅक्सी चालवण्याच्या व्यवसायात उतरले होते. तिथून ते पुन्हा या व्यवसायात आले होते. मात्र टाळेबंदीमुळे त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.