मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) विदर्भातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी नागपूर – गोंदिया, नागपूर – चंद्रपूर आणि भंडारा – गडचिरोली या तीन द्रुतगती महामार्गांच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. तसेच एमएसआरडीसीने खनिज वाहतुकीला वेग देण्यासाठी नवेगाव मोर – सुरजागड द्रुतगती महामार्गही बांधला जाणार आहे. महत्त्वाकांक्षी अशा या चारही महामार्गांच्या एकूण ४६ हजार कोटींहून अधिकच्या खर्चास नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली होती.

त्यानुसार एमएसआरडीसीने या चारही महामार्गांच्या बांधकामासाठी निविदा शुक्रवारी प्रसिद्ध केली आहे. सुमारे ७०१ किमीच्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाशी राज्यातील अधिकाधिक जिल्हे जोडले जावेत आणि दळणवळण व्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी अनेक ठिकाणी या महामार्गाचा विस्तार केला जात आहे. यात नागपूर – गोंदिया, नागपूर – चंद्रपूर आणि भंडारा – गडचिरोली या विस्तारित तीन महामार्गांचा समावेश आहे. दुसरीकडे खनिज वाहतुकीला चालना देण्यासाठी नवेगाव मोर ते सुरजागड असा खनिज वाहतूक महामार्गही बांधला जाणार आहे.

दरम्यान, विदर्भातील समृद्धी महामार्गाच्या तीन विस्तारित महामार्गांच्या कामासाठी काही वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र त्यावेळी एमएसआरडीसीच्या निश्चित दराच्या तुलनेत अधिक दराने निविदा सादर झाल्या होत्या. त्यामुळे या निविदा रद्द करण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढवली आणि प्रकल्पाची अंमलबजावणी लांबणीवर गेली. त्यानंतर पुन्हा सुधारित खर्चाचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. तीन विस्तारित समृद्धी महामार्गासह नवेगाव मोर -सुरजागड खनिज वाहतूक महामार्गाच्या खर्चाचाही प्रस्ताव एमएसआरडीसीकडून मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला सप्टेंबरअखेरीस मान्यता दिली.

या चार महामार्गांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या प्रकल्पांच्या बांधकामासाठीच्या निविदेचा मार्ग मोकळा झाला आणि आता अखेर शुक्रवारी एमएसआरडीसीकडून चारही महामार्गांच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. विदर्भातील चार महामार्गासह पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पातील उर्वरित दोन टप्प्यांच्या कामासाठीही शुक्रवारी एमएसआरडीसीकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली. आता विदर्भातील चार महामार्गासह पुणे वर्तुळाकार रस्त्याच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून २०२७ च्या सुरुवातीला कामास सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

…..