मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यासाठी विदर्भात तीन रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. नागपूर – गोंदिया, नागपूर – चंद्रपूर आणि भंडारा – गडचिरोली या तीन द्रुतगती महामार्गांचा यात समावेश आहे. तर खनिज वाहतुकीला वेग देण्यासाठी नवेगाव – सुरजागड द्रुतगती महामार्गही बांधण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या चारही प्रकल्पांच्या खर्चाला नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार एमएसआरडीसीने निविदा काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून आठवड्याभरात सुमारे ४६ हजार कोटी रुपयांच्या या चारही प्रकल्पांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर या चारही प्रकल्पांची कामे नवीन वर्षात सुरू करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

एमएसआरडीसीने राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यभरात अंदाजे चार हजार किमीचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील महत्त्वाचा असा ७०१ किमीचा नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग बांधून पूर्ण करून सेवेत दाखल केला आहे. आता हा महामार्ग राज्यातील अधिकाधिक जिल्ह्यांशी थेट जोडला जावा यासाठी समृद्धीचा विस्तार केला जात आहे. यात नागपूर – गोंदिया, नागपूर – चंद्रपूर आणि भंडारा – गडचिरोली या तीन द्रुतगती महामार्गांचा समावेश आहे. या तिन्ही महामार्गांच्या बांधकामासाठी काही वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र यावेळी एमएसआरडीसीच्या निश्चित दराच्या तुलनेत अधिक दराने निविदा सादर झाल्या होत्या. त्यामुळे या निविदा रद्द करण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढवली आणि प्रकल्पाची अंमलबजावणी लांबणीवर गेली. त्यानंतर पुन्हा सुधारित खर्चाचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. त्या प्रस्तावास नुकतीच सरकारने मान्यता दिल्याने नव्याने या प्रकल्पांसाठी निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर आठवड्याभरात या तिन्ही प्रकल्पांसाठी निविदा काढण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या तीन विस्तारीत प्रकल्पांच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून नवीन वर्षात कामाला सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्य़ांनी सांगितले. विदर्भातील तीन प्रकल्पांच्या बांधकामासह आणखी एका प्रकल्पासाठी आठवड्याभरात निविदा काढण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. नवेगाव – सुरजागड द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाच्या खर्चासही सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या बांधकामासाठीही निविदा काढण्यात येणार आहे. विदर्भातील दळणवळण व्यवस्थेला समृद्धी देणारे चार प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. त्याचवेळी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पातील तीन टप्प्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या तीन टप्प्यांचे आता दोन टप्पे करण्यात आले असून या टप्प्यांच्या बांधकाम खर्चालाही सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या दोन टप्प्यांच्या कामासाठीही चार प्रकल्पांबरोबरच निविदा काढली जाणार आहे. तर या टप्प्यांच्या कामालाही नवीन वर्षात सुरुवात केली जाणार आहे.

भंडारा – गडचिरोली द्रुतगती महामार्ग सुमारे ९४ किमी लांबीचा असून सहापदरी महामार्गाच्या बांधकामासाठी १०१४५.५९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूर – चंद्रपूर द्रुतगती महामार्गाची लांबी

२०४ किमी आणि चारपदरी महामार्ग असून यासाठी १७८४७.८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नागपूर – गोंदिया द्रुतगती महामार्ग १६२ किमी लांबीचा आणि सहापदरी असून या प्रकल्पाच्या बांधकामासाठी १४८८४.२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

८५ किमी लांबीच्या नवेगाव मोर – सुरजागड द्रुतगती महामार्गासाठी ३४२९.२१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

…………