मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात झपाट्याने बदल होत आहे. तसेच अनेक भागातील कमाल तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. शुक्रवारी विदर्भातील अनेक भागातील कमाल तापमानात वाढ नोंदली गेली. यात अमरावती, अकोला आणि वर्धा आदी भागातील पारा ४० अंश सेल्सिअसवर गेला. यामुळे विदर्भांतील उकाड्यात वाढ झाली आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात फेब्रुवारीपासूनच चढ-उतार पाहायला मिळत आहे. विदर्भातील सर्वच भागातील कमाल तापमान शुक्रवारी अधिक होते. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. येथील कमाल तापमान ४०.८ इतके नोंदले गेले. जे सामान्य तापमानाहून ६.३ अंश सेल्सिअसने अधिक होते. तर अकोला येथे ४०.७, नागपूरमध्ये ३८.७, वर्धा येथे ४०, यवतमाळमध्ये ३९, वाशीम येथे ३९ अंश सेल्सिअस इतके कमाल तापनाम होते. तर पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानही अधिकच होते.

सोलापूर येथे ३९.५, पुणे येथे ३६.८, जळगावमध्ये ३८.७, कोल्हापूरमध्ये ३६.१, मालेगाव येथे ३७.४ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते. तर मराठवाड्यातील छत्रपत्री संभाजीनगरमध्ये ३७.६, परभणीत ३८.५, धाराशिवमध्ये ३६.२ आणि बीड येथे ३६.६ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते. पुढील पाच-सहा दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईसह कोकणातील हवमान कसे असेल ?

मुंबईत बुधवारी आणि गुरुवारी पारा थेट ३८ अशांवर पोहोचल्याने या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद गुरुवारी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात झाली होती. येथील तापमान ३८.९ इतके होते. मात्र, शुक्रवारी मुंबईसह कोकणपट्ट्यातील कमाल तापमानात ३ ते ४ अंशांनी घट नोंदली गेली. यात मुंबईच्या कमाल तापमानात मागील दोन दिवसांच्या तुलनेत ४ अंशांनी घट झाली आहे. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबईतील किमान तापमानातही घट झाली असून हवामान केंद्राच्या कुलाबा विभागातील किमान तापमान शुक्रवारी २५.४, तर सांताक्रूझ विभागात २३.६ अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान, पुढील दोन दिवसात मुंबईसह उत्तर कोकणातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल, अशी शक्यता हवामान विभाकडून वार्तिविण्यात आली आहे. शनिवारी शहरातील कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.