मुंबई : विदर्भातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचा विकास करण्यासह अन्य काही रस्ते प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले आहेत. त्यानुसार नागपूर – गोंदिया, नागपूर – चंद्रपूर आणि भंडारा – गडचिरोली या तीन द्रुतगती महामार्गांच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. तसेच खनिज वाहतुकीला वेग देण्यासाठी एमएसआरडीसीने नवेगाव – सुरजागड द्रुतगती महामार्गही बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या चारही महामार्गांच्या एकूण ४६ हजार कोटींहून अधिकच्या खर्चास मान्यता देण्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून बांधकामासाठी १५ दिवसांत निविदा काढण्यात येणार आहे.
नागपूर – मुंबई अंतर आठ तासांत पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग बांधला. राज्यातील अधिकाधिक जिल्हे या महामार्गाशी जोडले जावेत आणि दळणवळण व्यवस्थेला बळकटी मिळावी यासाठी अनेक ठिकाणी या महामार्गाचा विस्तार केला जात आहे. यात नागपूर – गोंदिया, नागपूर – चंद्रपूर आणि भंडारा – गडचिरोली या विस्तारित तीन महामार्गांचा समावेश आहे. या महामार्गाच्या संरेखनास मान्यता मिळाल्यानंतर एमएसआरडीसीने या महामार्गांच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यानुसार राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली. या चार महामार्गांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या प्रकल्पांच्या बांधकामासाठी १५ दिवसांत निविदा काढण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
प्रत्येक महामार्गाच्या खर्चाचे नियोजन असे
भंडारा – गडचिरोली दरम्यानच्या ९४ किमी लांबीच्या सहापदरी महामार्गाच्या १०१४५.५९ कोटी रुपयांच्या, तर नागपूर – चंद्रपूर दरम्यानच्या २०४ किमी लांबीच्या चारपदरी द्रुतगती महामार्गाच्या १७८४७.८६ कोटी रुपयांच्या खर्चास सरकारने मान्यता दिली. तसेच नागपूर – गोंदिया दरम्यानच्या १६२ किमी लांबीच्या सहापदरी द्रुतगती महामार्गाच्या १४८८४.२७ कोटी रुपयांच्या खर्चासही सरकारने मान्यता दिली. विदर्भातील खनिज वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एमएसआरडीसीने ८५ किमीचा नवेगाव मोर – सुरजागड द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गाच्या ३४२९.२१ कोटी रुपयांच्या खर्चासही सरकारने मंजुरी दिली. या चारही महामार्गांमुळे विदर्भातील विकासाला गती मिळणार आहे.
