मुंबई : विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज, शुक्रवार शेवटची मुदत आहे. या मुदतीनंतर विधान परिषद निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट होईल. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि शिवेसना शिंदे गटाने आपले अधिकृत उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गट माघार घेणार की भाजपशी मैत्रीपूर्ण लढणार, याचा निर्णय आजच होईल.
विधान परिषदेच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात अर्ज दाखल केल्याने दोन्ही बाजूकडून बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना कितपत यश मिळाले, हे आज स्पष्ट होईल.
११० उमेदवारांचे अर्ज बाद
दरम्यान, विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी एकूण ३६५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. छाननीत ११० उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. नागपूर आणि औरंगाबाद पदवीधरमध्ये प्रत्येकी ५४, पुणे पदवीधरमध्ये ६९, अमरावती शिक्षकमध्ये ३० तर पुणे शिक्षक मतदारसंघात ४८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
पुणे पदवीधरमध्ये सर्वाधिक मतदार
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत मतदार नोंदणी करता येते. त्यानुसार पुणे पदवीधरमध्ये ३ लाख ३१ हजार ९६०, नागपूरमध्ये २ लाख ५७ हजार ३४ तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात ३ लाख २७ हजार ९६१ मतदार नोंदले गेले आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात ६३ हजार ७८९ आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ३५ हजार ८१० मतदारांची नोंद झाली आहे.
मतदारसंघनिहाय मतदान केंद्राची संख्या
पुणे पदवीधर……७४१
नागपूर पदवीधर……४४५
औरंगाबाद पदवीधर…..८४२
पुणे शिक्षक………………३१०
अमरावती शिक्षक ……….८१
