काळजीवाहू मुख्यमंत्र्यांसाठी कालमर्यादा नाही

घटनेतील १७२ व्या कलमातील तरतुदीनुसार १३वी विधानसभा शनिवारी मध्यरात्री संपुष्टात येईल. निवडून आलेल्या नव्या सदस्यांची नावे आधीच राजपत्रात प्रसिद्ध झाली असल्याने १४वी विधानसभा अस्तित्वात आली आहे.

विधानसभेची मुदत संपुष्टात येत असल्याने राज्यपाल आता सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करतील. सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला आधी पाचारण केले जाईल. यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाला पाचारण केले जाईल. कोणत्याच राजकीय पक्षाने सरकार स्थापण्याची तयारी दर्शविली नाही तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करतील.

राजीनामा सादर केल्यावर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना केली. घटनेत काळजीवाहू अशी कोणतीही तरतूदच नाही. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांसाठी कोणतीही कालमर्यादा नाही, असे राज्य विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव विलास पाटील यांचे म्हणणे आहे. तरीही काळजीवाहू मुख्यमंत्री हा जास्त काळ पदावर राहू नये हे संकेत असल्याची प्रतिक्रिया लोकसभेचे निवृत्त सचिव सुभाष कश्यप यांनी व्यक्त केली. राज्यपालांनी आता सरकार स्थापण्याची प्रक्रिया सुरू करायला पाहिजे, असेही कश्यप यांचे म्हणणे आहे.

राज्यपालांच्या पुढील भूमिकेकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे लक्ष असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. घटनेतील तरतुदीनुसार राज्यपालांनी आता प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षा विरोधकांनी व्यक्त केली. भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झाल्याने शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस असे संयुक्त सरकार स्थापण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.