मुंबई: गेल्या किमान चार पाच वर्षांपासून रखडलेल्या विद्याविहार पुलाचे काम आता आणखी रखडणार असून पुलाचे रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झाले असले तरी पुलासाठीचे पोहोचमार्ग तयार करण्यात अनेक अडथळे आले आहेत. रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे, बांधकामे हटवल्याशिवाय हे पोहोचमार्ग बांधता येणार नाहीत. त्यामुळे या पुलासाठी आता फेब्रुवारी २०२६ ची मुदत देण्यात आली आहे.
विद्याविहार रेल्वे स्थानकातील उड्डाणपूल हा पूर्व उपनगरातील एक प्रमुख नवीन वाहतूकीचा पर्याय असेल. हा पूल विद्याविहार पश्चिमेकडील एलबीएस मार्ग ते पूर्वेकडील आरसी मार्गाला जोडतो. विद्याविहार पूल बांधताना दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी एक असे दोन स्टील गर्डर स्थापन करावे लागणार होते. त्यापैकी पहिला गर्डर २७ मे २०२३ ला यशस्वीपणे स्थापन करण्यात आला होता. दुसऱ्या गर्डरचे काम ४ नोव्हेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले. रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण झाली तरी या पुलाचे काम अद्याप होऊ शकलेले नाही.
हेही वाचा >>>यंदा गणेश विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव; गेल्या ११ वर्षांत कृत्रिम तलावातील गणेशमूर्ती विसर्जनात ३७१ टक्क्यांनी वाढ
विद्याविहार उड्डाणपुलाची लांबी ६१२ मीटर आहे. रेल्वेवरील आतापर्यंतचे सर्वाधिक असे प्रत्येकी ९९.३४ मीटर लांब व ९.५० मीटर रुंद असे हे दोन्ही गर्डर असून त्यांचे वजन प्रत्येकी सुमारे अकराशे मेट्रिक टन आहे. विशेष म्हणजे या गर्डरला रेल्वे रुळांच्या मधोमध आधार न ठेवता, विनाखांब एकसंघपणे त्याची उभारणी केली आहे. रेल्वेच्या संरचनात्मक आराखड्यात बदल झाल्याने रेल्वे हद्दीतील पुलाच्या कामांनाही विलंब झाला. त्यामुळे पुढील प्रक्रियाही रखडली. यातील दुसरा टप्पा पोहोच रस्त्यांचा असून त्यातही अडथळे आहेत.
पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या मार्गात ८० बांधकामांचा अडथळा आहे. तसेच म्हाडाचीही इमारत आहे. तसेच विविध प्रकारची १८५ झाडे असून त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याची माहिती पूल विभागातील सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>>गिरगाव चौपाटीवर ब्लू बॉटल जेलीफिशचा वावर
२०१६ पासून पूल रखडला
या पुलाचा आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला होता. सन २०२२ मध्ये बांधून हा पूल तयार होणार होता. मात्र रेल्वे मंत्रालयाच्या संशोधन, डिझाइन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) पुलाच्या डिझाईन मध्ये बदल सुचवले. यामुळे रेल्वे हद्दीतील आराखड्यात बदल करावा लागला. त्याच बरोबर पुलाच्या पूर्व आणि पश्चिम भागातही बदल करावे लागले. २ मे २०१८ रोजी पुलाच्या बांधकामाचा कार्यादेश देण्यात आला. मात्र टाळेबंदी करोनामुळे पूलाचे काम रखडले होते. तर आता प्रकल्पाच्या आड येणारी बांधकामे व झाडे यामुळे हा पूल रखडला आहे.
विद्याविहार पूल झाल्यास चार मार्गिकांचा रुंद उड्डाणपूल उपलब्ध होणार आहे. तसेच एलबीएस मार्ग आणि आरसी मार्ग जोडले जातील. ज्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होईल.