मुंबई : विद्याविहार येथील ”हिट-अँड-रन” प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला. हा मुलगा पालकांच्या नियंत्रणाखाली नव्हता, तर तो बिघडलेल्या आणि श्रीमंत मुलांच्या संगतीत होता. ही मुले स्टंट्सच्या चित्रफिती तयार करणे इत्यादींसारख्या गोष्टींमध्ये मग्न असतात. त्यामुळे समाजातील अशा प्रकारच्या कृतींना आळा घालण्यासाठी, आता सज्ञान झालेल्या प्रकरणातील या मुलाला ”सुधारणा गृहात” ठेवणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले.

या वर्षी ५ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेच्या वेळी या मुलाचे वय १७ वर्षे आणि ८ महिने होते. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करताना काही निरीक्षणे नोंदवली होती. त्यानुसार, प्रकरण मिटवण्यासाठी त्याच्या कुटुंबाने पीडितांना काही रक्कम देऊ केली होती, तसेच मुलगा बिघडलेल्या आणि श्रीमंत मुलांच्या संगतीत राहून दुचाकी व चारचाकी वाहनांवर बेकायदेशीर आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे स्टंट्स करत होता, असे सत्र न्यायालयाने आदेशात म्हटले होते.

आरोपीने निष्काळजीपणे गाडी चालवून ध्रुमिल प्रेमजी पटेल याच्या दुचाकीला धडक दिली होती. त्यात ध्रुमिल पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी मीनल पटेल पूर्णपणे अर्धांगवायूने ग्रस्त झाल्या. नोंदीवरून, अल्पवयीन मुलाने केवळ स्वतःच्याच नव्हे, तर इतरांच्याही आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोक्यात घातले होते आणि त्याला आपल्या कृत्यांबद्दल बढाई मारण्याची सवय होती. त्याच्या पालकांना या कृत्यांची कल्पना होती, परंतु त्यांनी त्याला रोखण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. परिणामी, कोणत्याही चुकीशिवाय एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आणि दुसरी व्यक्ती पूर्णपणे अर्धांगवायूग्रस्त झाली, असे निरीक्षण एकलपीठाने मुलाचा जामीन रद्द करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवताना नोंदवले.

वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर वय १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच आरोपी मुलगा दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवत होता. तसेच तो ती वाहने अत्यंत धोकादायक पद्धतीने चालवत होता. यावरून पालकांचे त्याच्या हालचालींवर कोणतेही नियंत्रण नाही. घटनेच्या वेळी त्याचे वय १७ वर्षे ८ महिने होते म्हणजेच तो १८ वर्षे पूर्ण होण्याच्या जवळ होता. अशा कृत्यांना आळा घालणे आवश्यक आहे, यामुळे मुले बिघडतात आणि समाजाला धोका निर्माण होतो. प्रकरणातील मुलगा विद्यार्थी असला तरी, त्याला सुधारगृहात ठेवले तरच त्याला त्याच्या कृत्याचे गांभीर्य समजेल, असेही न्यायमूर्ती दिगे यांनी आदेशात नमूद केले.