मुंबई – विद्याविहार रेल्वे स्थानकामुळ १८९ झाडे बाधित होणार असून त्या झाडांच्या बदल्यात मुंबई महापालिकेला २२७८ झाडे लावावी लागणार आहेत. ही झाडे नवीमुंबईत लावण्यात येणार असून त्याकरीता महाराष्ट्र वन विकस महामंडळाची नेमणूक करण्यात येणार आहेत. मात्र प्रकल्पासाठी मुंबईतील झाडे हटवणार आणि वृक्षारोपण नवी मुंबईत हे योग्य नसल्याचे सांगत आरे वसाहतीत ही झाडे लावावी अशी मागणी स्थायी समितीत सदस्यांनी केली.

विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पोहोच रस्त्यांच्या कामासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर बुधवारी चर्चेसाठी आला होता. ७६ कोटींचे हे काम असून दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. पोहोचरस्त्यांच्या बांधकामाआधी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाअंतर्गत एकूण १८९ वृक्ष बाधित होत आहेत. त्यामुळे याबाबत पूल विभागाने वृक्ष प्राधिकरणाकरण कडे प्रस्ताव पाठवला होता. पोहोचरस्त्यामुळे ६५ झाडे कापावी लागणार आहेत तर ७३ झाडांचे

पुनर्रोपण करावे लागणार आहे. तर ५१ झाडे जागेवर कायम असतील. जी झाडे बाधित होणार आहेत त्या बदल्यात भरपाई म्हणून मुंबई महापालिकेला २२७८ नवीन झाडांची लागवड करावी लागणार आहे. हे काम महाराष्ट्र वन विकास महामंडळ नियुक्त कंत्राटदाराद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी महामंडळाला झाडांच्या पुनर्रोपणासाठी पालिकेचा १ कोटी ९९ लाख रुपये खर्च मुंबई महापालिकेला द्यावा लागणार आहे. त्यात झाडांच्या देखभालीचा सात वर्षांचा खर्चही समाविष्ट आहे.

इथे करणार लागवड

या झाडांची लागवड पनवेल येथील मौजे करंजाडे येथील २.०५ हेक्टर जागेवर केली जाणार आहे. मात्र, मुंबईतील प्रकल्पांमुळे बाधित झालेली झाडे नवी मुंबईत कशाला असा प्रश्न नगरसेविका प्रीती सातम यांनी उपस्थित केला आहे. आरे वसाहतीत भरपूर जागा आहे, तेथे झाडे लावावी अशी सूचनाही त्यांनी केली.