मुंबई : विद्याविहार येथील कैलास अव्हेन्यू या सोसायटीच्या आवारात जैन मुनींच्या स्वागतासाठी तैलरंगाने (ऑईल पेंट) पांढऱ्या रंगाच्या पट्टया आखण्यात आल्या आहेत. सोसायटीतील रहिवाशांना न विचारताच या पट्ट्या आखण्यात आल्याचा आरोप करीत समाजमाध्यमावरील प्रभावशाली व प्रसिद्ध असलेले प्रसाद वेदपाठक यांनी आक्षेप घेतला आहे. वेदपाठक हे त्याच सोसायटीत राहत असून या सोसायटीच्या जमिनीची मालकी वेदपाठक कुटुंबाची आहे. जैन मुनींच्या पायवाटेसाठी कायमस्वरूपी अशी पट्टी आखण्याबाबत वेदपाठक यांनी समाजमाध्यमांवरूनच तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

विद्याविहार परिसरातील एका सोसायटीच्या आवारात दोन दिवसांपूर्वी पांढऱ्या रंगाच्या पट्टया आखण्यात आल्या आहेत. जैन मुनी, साधू संत यांच्या आगमनाकरीता या पट्ट्या आखण्यात आल्या असून याला समाज माध्यम प्रभावक प्रसाद वेदपाठक यांनी विरोध केला आहे. प्रसाद हे ज्या सोसायटीत राहतात त्याच सोसायटीच्या आवारात या पट्ट्या आखण्यात आल्या आहेत. याबाबत प्रसाद यांनी सांगितले की या सोसायटीची जागा पणजोबांनी विकत घेतली होती व आजीने ही इमारत बांधली. या इमारतीत आमच्या सात सदनिका आहेत. बाकीच्या सदनिका विकल्या आहेत. या सोसायटीत पट्ट्या मारताना इतर रहिवाशांप्रमाणे आम्हाला विचारण्यातही आलेले नाही. एका कुटुंबात जैन साधू येणार असल्यामुळे त्यांच्यासाठी या पट्ट्या मारल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑईलपेंटने ही पट्टी मारल्यामुळे ती कायमस्वरुपी राहणार आहे. ही पट्टी मारताना आम्हाला विचारण्याची आवश्यकता का वाटली नाही असा प्रश्न प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. व्यवस्थापकीय समितीच्या चार पाच जणांनी परस्पर परवानगी दिली असल्याचा आरोपही प्रसाद यांनी केला आहे.

कशासाठी पट्ट्या …

जैन साधूसंत जेव्हा अनुयायांच्या घरी जातात तेव्हा त्यांच्या घराच्या मार्गावर अशा पट्टया आखल्या जात आहेत.उन्हाळ्यात जमीन तापते त्यामुळे अनवाणी चालणाऱ्या साधुसंतांच्या पायाला अशा पट्ट्यांमुळे उष्णता लागत नाही. तसेच जीवदयेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मातील साधुसंत चालत असताना त्यांच्या पायाखाली जीवजंतू मरू नये, तसेच पावसाळ्यात जमिनीवर शेवाळ साचते व ते पायाखाली चिरडले जाऊ नये याकरीता या पट्ट्या आखल्या असल्याचे सांगितले जात आहे.

विद्याविहारमध्ये अनेक ठिकाणी पटट्या

दरम्यान, विद्याविहारमध्ये अनेक ठिकाणी पदपथावर अशा पट्ट्या असून या पट्टया आता घरापर्यंत आल्या आहोत. हिंदू खतरेमे है असे सांगितले जात होते पण खतरा नक्की कोणापासून आहे असा प्रश्न आता मला पडू लागला आहे, अशीही प्रतिक्रिया वेदपाठक यांनी दिली आहे. स्थानिकांना विचारण्याचेही सौजन्य दाखवले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे – महापौर रितू तावडे

आपण सर्व धर्मांचा आणि साधूसंतांचा आदर केला पाहिजे. एखाद्या सोसायटीत अशा पट्ट्या मारल्या असतील तर तो त्या सोसायटीचा प्रश्न आहे. सोसायटीने परवानगी दिली असेल तर काहीच हरकत नाही. एका व्यक्तीने विरोध केला म्हणजे सगळ्यांचाच विरोध आहे असे नाही, अशी प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी दिली आहे.

दरम्यान, याबाबत सोसायटीचे सरचिटणीस सतीश जैस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वेदपाठक यांचे विरोधाचे पत्र मिळाले असून त्याला आम्ही महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह सोसायटी ऍक्टप्रमाणे उत्तर देऊ. कायद्यानुसार काही निर्णय हे व्यवस्थापकीय मंडळ घेत असतात तर काही निर्णय जनरल बॉडीसमोर ठेवले जातात. त्यानुसार व्यवस्थापकीय मंडळाने आपल्या अधिकारात या पट्ट्यांसाठी परवानगी दिली असल्याचे जैस्वाल यांनी सांगितले.