मुंबई : गेल्या महिन्यात विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयाजवळ झालेल्या अपघाती मृत्यूशी संबंधित प्रकरणातील अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या अल्पवयीन मुलाकडून गाडी चालविताना हा अपघात झाला होता आणि त्यात एका ३३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. सत्र न्यायालयाने या अल्पवयीन मुलाच्या व्यावसायिक वडिलांना दोन दिवसापूर्वीच जामीन मंजूर केला होता. त्यानंतर, आता मुलाला बाल न्याय मंडळाने जामीन मंजूर केला.

सोमय्या महाविद्याजवळ ५ फेब्रुवारी रोजी हा अपघात झाला. अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असताना त्याने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये धुर्मील आणि मीनल पटेल हे जोडपे जखमी झाले. त्यानंतर १० दिवसांनी धुर्मीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर, अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांवर भारतीय न्याय संहिताच्या संबंधित तरतुदींनुसार बेदरकारपणे गाडी चालवणे, सदोष मनुष्यवध आणि इतरांच्या जीवाला व सुरक्षिततेला धोका निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, अल्पवयीन मुलाविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेचे कुटुंबीय या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.